मणिरत्नम यांचाच ‘साथिया’ दिग्दर्शक शाद अलीने रिमेक केला होता. त्यावेळी मुंबईची ही प्रेमकथा या शहराच्या वैशिष्टय़ासह चित्रपटात उतरली होती. आता पुन्हा एकदा मणिरत्नम यांची नवी प्रेमकथा शादनेच ‘ओके जानू’ म्हणून पडद्यावर आणली आहे. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून फ्रेश असलेला हा चित्रपट खूपच सरळसोट पद्धतीने पुढे नेला असल्याने असे कुठलेच भावनिक खाचखळगे नसलेली ही प्रेमकथा उगीचच मनात रेंगाळत नाही. आदि आणि तारा या तरुण जोडप्याची प्रेमकथा सांगणारा ‘ओके जानू’ अनेक ठिकाणी वेगळेपणा घेऊन आला असला तरी ही कथा सर्वोत्तम ठरत नाही. ती ‘ओके’च राहते.

चित्रपटाची पहिली फ्रेमच अ‍ॅनिमेशनने सुरू होते. मुंबईच्या रस्त्यांवरून आपल्या नायिकेला वाचवण्यासाठी धावणारा नायक त्या अ‍ॅनिमेशनच्या खेळात दिसतो. चित्रपटाचा नायक आदि (आदित्य रॉय कपूर) जो व्हीडिओ गेम डेव्हलपर आहे त्याची ही पहिली ओळख आपल्याला होते. मुंबईत उतरल्या उतरल्या एका विचित्र प्रसंगामुळे त्याची गाठभेट ताराशी (श्रद्धा कपूर) होते. आदि कामासाठी मुंबईत आला असल्याने राहण्यासाठी त्याची व्यवस्था निवृत्त न्यायाधीश असलेल्या गोपी (नसीरुद्दीन शहा) यांच्या घरी होते. तारा आणि आदि पुन्हा एकदा अचानक भेटतात, त्यांच्या भेटीगाठी वाढतात. लग्न करायचे नाही, यावर दोघेही ठाम आहेत. एकमेकांसोबत राहण्यासाठी ते ‘लिव्ह इन’चा पर्याय स्वीकारतात, पण दोघांनाही परदेशात करिअर करायचं असल्याने जेव्हा वेळ येईल तेव्हा आपापल्या ठिकाणी करिअरसाठी निघून जायचे, इतक्या सहज विचाराने ते एकत्र राहायला लागतात. करिअरचा मुद्दा इथे उचलला असला तरी मुळातच आत्ताच्या तरुण पिढीचा प्रेम आणि लग्नसंस्था यातला गोंधळा हाच विषय चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. त्याला कुठेही वादाचे स्वरूप देण्याचा किंवा भावनिक ताणेबाणे देण्याची संधी दिग्दर्शकाला कथेत मिळत नाही. त्यामुळे आदि आणि ताराचं फु लत गेलेलं प्रेम, एकत्र असूनही ते कबूल करता येत नसल्याने होणारी कुतरओढ, एकमेकांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या नादात स्वत:ची भावना लपवणं या सगळ्या गोष्टी म्हणजेच ‘ओके जानू’ चित्रपट आहे.

‘ओके जानू’मध्ये जो ताजेपणा जाणवतो तो मांडणीत आहे. मुळात, प्रेमाची संकल्पना वेगाने बदलली आहे. त्यामुळे एकाच भेटीनंतर आदि आणि ताराचं एकत्र येणं, एकमेकांना समजून घेण्यासाठी सतत भेटणं आणि त्यातून ‘लिव्ह इन’पर्यंत येण्याचा झटपट घेतलेला निर्णय हे सगळे संदर्भ आजच्या काळाला साजेशा पद्धतीनेच येतात. त्याला रेहमानच्या संगीताची जोड असल्याने हा भाग अधिक खुलून येतो. या दोघांनाही आपले निर्णय घेण्यासाठी आईवडिलांचा आधार घ्यावासा वाटत नाही. ताराला आईवडिलांच्या घटस्फोटाची पाश्र्वभूमी आहे. तर आदिही त्याच्या दादा-वहिनींबरोबर आहे. पण या दोघांनाही नात्यातील जबाबदारीची जाणीव करून देणारा आणखी एक धागा आहे तो गोपी आणि त्यांची स्मृतिभ्रंशाच्या आजाराने त्रस्त असलेली पत्नी चारू (लीला सॅमसन) यांच्या प्रेमाचा आहे. आपल्या पत्नीची दिवसरात्र सेवा करणारे गोपी आणि कधीतरी आपण आपल्या नवऱ्यालाच विसरलो तर या विचाराने व्यथित होणारी चारू या दोघांचंही घट्ट नातं, त्यांचं एकमेकांना जपणं कुठेतरी तारा आणि आदिला आपल्या नात्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देतं. हा सगळा या चित्रपटाचा मुख्य भाग असला तरी सुरुवातीचा भाग सोडला तर चित्रपटाची कथा तिथल्या तिथेच रेंगाळत राहते. तारा आणि आदि यांचे दोघांचे व्यवसाय वेगवेगळे असले तरी आजच्या स्पर्धात्मक युगातली कॉर्पोरेट कंपन्या आणि त्यांचे ताणतणाव पाहता त्यांच्या व्यवसायाचे दाखवलेले हलकेफुलके स्वरूप खोटे वाटते. केवळ एकमेकांपासून दूर होणार हा व्यवहाराचा भाग उराशी कवटाळून धरून बसलेल्या या दोघांचे सतत एकत्र येत राहण्यातच ही कथा अडकून पडली आहे. पण स्वत:च्या चुकांमधून शिकून पुढे जात आपल्या निर्णयापर्यंत येणं हा या पिढीचा स्थायिभाव या दोघांच्या व्यक्तिरेखांमधून प्रामुख्याने रंगवण्यात आला आहे, जो इथे महत्त्वाचा ठरतो. नसीरुद्दीन शहा आणि लीला सॅमसन या दोन बुजुर्गाच्या प्रेमक थेचा पदरही वेगळा आहे. पण या चौघांचं एकत्रित येऊन पुढे जाणं तितकं मनात ठसत नाही. कॅमेऱ्याची कमाल, आदित्य आणि श्रद्धा यांची सहज केमिस्ट्री, नसीरुद्दीन शहा – लीला सॅमसन यांचा संयत अभिनय आणि सोपी मांडणी यामुळे चित्रपट ताजा ताजा अनुभव देतो. एक हलकीफुलकी प्रेमकथा यापलीकडे ‘ओके जानू’ फारसा प्रभाव टाकत नाही.

ओके जानू

दिग्दर्शक – शाद अली

पटकथा – मणिरत्नम

कलाकार – आदित्य रॉय कपूर, श्रध्दा कपूर, नसीरुद्दीन शहा, लीला सॅमसन, किट्टु गिडवानी.