मराठी चित्रपटसृष्टीत नवनवे प्रयोग होत असताना आणि तांत्रिकदृष्टय़ा मराठी चित्रपट प्रगत होत असताना याच चित्रपटसृष्टीतील एका दिग्दर्शकाने थोडे मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्याने एक काळ गाजवलेल्या आणि अजूनही रसिकांच्या मनात रूंजी घालणाऱ्या गाण्यांचा आधार घेतला आहे. या दिग्दर्शकाचे नाव राजेश देशपांडे आणि त्याने हा प्रयोग केलेला चित्रपट म्हणजे ‘कुणी घर देता का घर’! या चित्रपटात काही ज्येष्ठ कलाकारांना जून्या जमान्यातील अभिनेते-अभिनेत्रीं यांची वेशभूषा देत राजेश देशपांडे यांनी त्यांच्यावर जूनी गाणी चित्रीत केली आहेत. मराठीतील हा कदाचित पहिलाच प्रयोग असावा.
मराठी चित्रपटांना ‘पॅरेडी’ गाण्यांची सवय लक्ष्मीकांत बेर्डे-महेश कोठारे यांच्या चित्रपटांनी लावली. त्यांच्या चित्रपटांमध्ये जून्या गाण्यांच्या चालीवर मराठी शब्द लिहून तयार केलेली गाणी हमखास असायची. या गाण्यांनीही एकेकाळी चांगलीच धम्माल उडवून दिली होती. मात्र आम्हाला थोडा वेगळा प्रयोग करायचा होता. ‘कुणी घर देता का घर’ या चित्रपटातील एका प्रसंगामुळे हा प्रयोग करण्याची संधी आयतीच चालून आली, असे देशपांडे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
या चित्रपटात भरत जाधव आणि क्रांती रेडकर हे दोघेही एका वृद्धाश्रमात कामासाठी राहत असतात. त्या वेळी एक वृद्ध जोडपे आपल्या नातवाच्या आठवणीने हळवे होते. मग भरत या सगळ्यांचा मूड बदलण्यासाठी ‘तरुण होऊ या’ असे सांगत प्रत्येकाला त्यांच्या आवडत्या गाण्यावर ताल धरायला लावतो, असा प्रसंग आहे. मला स्वत:ला जूनी गाणी आवडतात. या प्रसंगात ती वापरण्याची संधी होती. मग या गाण्यांवर थोडी सांगीतिक प्रक्रिया करून ती गाणी या जोडप्यांवर चित्रित करण्यात आली आहेत, असे देशपांडे म्हणाले.
शोभा प्रधान-किशोर प्रधान, विजय चव्हाण-वर्षां तांदळे, विजू खोटे-शुभांगी लाटकर, शैलेश पितांबरे-छाया कदम आणि भरत-क्रांती या जोडय़ांवर ही गाणी चित्रीत झाली आहेत. या जोडप्यांना वेगळा लूक देण्यासाठी देशपांडे यांनी जून्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्यांचा आधार घेतला आहे. प्रत्येक जोडप्यातील कलाकारांना राजेश खन्ना, धर्मेद्र, हेमामालिनी वगैरेंसारखी वेशभूषा दिली आहे. तसेच हे गाणे ‘कृष्ण-धवल’ रंगापासून ‘सेपिया’ टोनपर्यंत विविध टोन्समध्ये चित्रीत करण्यात आले आहे.
गाणी कोणती कोणती?

  • ‘अजून त्या झुडुपांच्या मागे’
  • ‘रानात सांग कानात अपुले नाते’
  • ‘कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा’
  • ‘इथेच आणिक या बांधावर अशीच श्यामल वेळ’
  • ‘सहज सख्या एकटाच येई सांजवेळी, वाट तुझी पाहीन मी आम्रतरू खाली’

‘रॉयल्टी’चे काय?
साधारणपणे एखादे जूने गाणे जसेच्या तसे वापरायचे असेल, तर त्याची रॉयल्टी द्यावी लागते. मात्र त्यातही ते गाणे ३० सेकंदांपेक्षा कमी वापरायचे असेल, तर रॉयल्टी द्यावी लागत नाही. हाच विचार करून प्रत्येक गाणे ३० सेकंदांपेक्षा कमी काळासाठीच वापरण्यात आले आहे. एवढय़ाच काळात ती गाणी योग्य प्रकारे बसावीत, यासाठी रोहन प्रधान या संगीतकाराने त्यावर काही सांगीतिक प्रक्रिया केली आहे. मूळात यापैकी अनेक गाण्यांना पन्नासहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ‘रॉयल्टी’च्या कक्षेत ही गाणी येणार नाहीत. तरीही सावधपणा म्हणून ही गाणी ३० सेकंदांच्या वर वापरण्यात आलेली नाहीत.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…