भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केलाय. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केलीय. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम भारतीय महिलांना करुन दाखवत मोठ्या थाटात उपांत्यफेरीत प्रवेश केल्यानंतर सर्वच स्तरातून भारतीय महिलांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय महिला खेळाडूंबरोबरच आणखीन एका व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्या व्यक्तीचं नाव आहे , शोर्ड मरिन. शोर्ड मरिन हे भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत. शोर्ड मरिन यांचे अनेक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत. इतकच नाही तर आजच्या विजयानंतर अनेकांनी ‘चक दे इंडिया’ चित्रपटामध्ये शाहरुख खानने साकारलेल्या कबीर खानशी शोर्ड मरिन यांची तुलना केलीय. याच पार्श्वभूमीवर शाहरुख खाननेही शोर्ड मरिन यांना एक खास संदेश पाठवलाय.

नक्की पाहा >> ‘कबीर खान’शी होतेय भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकांची तुलना… पण त्यांचं एका महिन्याचं मानधन पाहून चक्रावून जाल

झालं असं की, भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारल्यानंतर शोर्ड मरिन यांना अश्रू अनावर झाले. ते मैदानातच रडू लागले. त्यानंतर त्यांचे अनेक फोटो व्हायरल झालं. मात्र नंतर शोर्ड यांनीच भारतीय महिला संघासोबतचा एक सेल्फी पोस्ट केला. त्यांनी या फोटोला एक मजेदार कॅप्शनही दिलीय. “कुटुंबियांनो मला माफ करा, घरी येण्यासाठी मला आणखीन काही कालावधी लागेल,” अशा कॅप्शनसहीत शोर्ड मरिन यांनी भारतीय महिला संघासोबतचा सेल्फी पोस्ट केलाय. म्हणजेच आता भारतीय महिला संघ पुढील फेरीत गेल्याने आपल्याला आणखीन काही काळ संघासोबत थांबावं लागणार असल्याचं शोर्ड यांनी मजेदार पद्धतीने सांगितलं आहे. तसेच त्यांनी कुटुंबियांची माफीही मागितलीय.

नक्की पाहा हे १० फोटो >> एक.. दोन.. तीन.. दे धक्का… भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतरचे मैदानावरील फोटो

सकाळपासूनच शाहरुखने साकारलेल्या कबीर खान या भूमिकेशी शोर्ड यांची तुलना होत असतानाच शाहरुखनेही या मजेदार कॅप्शनसहीत पोस्ट केलेल्या फोटोवर प्रतिक्रिया दिलीय. शाहरुखने हे ट्विट कोट करुन रिट्विट केलं आहे. “होय काही हरकत नाही फक्त येताना घरी कोट्यावधी कुटुबियांसाठी थोडं गोल्ड (सुवर्णपदक) घेऊन या… यंदा धनत्रयोदशी २ नोव्हेंबरलाच (माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच) आहे. माजी प्रशिक्षक कबीर खानकडून…” असं शाहरुखने ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याने धनत्रयोदशीला सोन्याची आणि लक्ष्मीची पुजा केली जाते हा संदर्भही सुवर्णपदकाशी आणि स्वत:च्या वाढदिवसाशीही जोडलाय. म्हणजेच गोल्डच्या स्वरुपात तुम्ही ही लाखमोलाची भेट भारतीयांना द्या आणि मलाही माजी प्रशिक्षक म्हणून सप्राइज द्या, असा संदेशच शाहरुखने भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकांना दिलाय.

नक्की वाचा >> Olympics 2020 Hockey : भारत सरकारने Meme शेअर करत केलं भारतीय महिलांचं अभिनंदन

कोण आहेत शोर्ड मरिन?

शोर्ड मरिन हे मूळचे नेदरलँड्सचे आहेत. शोर्ड हे २००३ पासून वेगवेगळ्या संघांना हॉकीचं प्रशिक्षण देत आहेत. त्यांना कोच म्हणून १८ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. मागील तीन वर्षांपासून म्हणजेच २०१८ च्या मध्यापासून ते भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक आहेत. २०१७ ते २०१८ दरम्यान शोर्ड मरिन हे भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक होते.