२००७ सालची सकाळ असेल. युवराज सिंगने एका षटकात सहा षटकार मारले म्हणून त्याला १ कोटी  बक्षिसादाखल जाहीर करण्यात आले होते. त्याच वृत्तपत्रात विदर्भातील कित्येक शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आणि मन सुन्न करणारी बातमी होती. या दोन बातम्यांमध्ये काही जोडण्यासारखे होते का? होते ते एक कोटी रुपये ज्यांनी युवराजच्या सहा षटकारांसाठी जाहीर केले. त्यांना तेवढय़ाच एक कोटी रुपयांमध्ये किती तरी शेतक ऱ्यांच्या विधवा पत्नींचे संसार वाचवता आले असते. या विरोधाभासातूनच ‘प्रोजेक्ट मराठवाडा’ चित्रपटाची सुरुवात झाली, असे दिग्दर्शक भाविन वाडिया यांनी सांगितले.
विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक ऱ्यांच्या आत्महत्या, त्यांच्यामागची कारणे या सगळ्याचा सखोल अभ्यास करून त्याची मांडणी करणाऱ्या सत्यव्रत त्रिपाठी निर्मित ‘प्रोजेक्ट मराठवाडा’ या हिंदी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली. या चित्रपटात अभिनेता ओम पुरी यांनी तुकाराम नावाच्या विदर्भातील शेतक ऱ्याची भूमिका साकारली आहे. आत्तापर्यंत रंगभूमीवर काम केलेल्या भाविन यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी शेतक ऱ्यांच्या आत्महत्येचा विषय निवडला तो त्यांना आलेल्या अनुभवातून.
२००७ मध्ये हा प्रसंग घडल्यानंतर अभ्यास आणि संशोधनाला सुरुवात झाली. २००९ साली प्रत्यक्ष पटकथा लिहिण्यासाठी सुरुवात केली. दरम्यानच्या काळात प्रत्यक्ष नागपूर आणि विदर्भात ठिकठिकाणी फिरून आत्महत्या केलेल्या शेतक ऱ्यांच्या कुटुंबाची भेट घ्यायची, त्यांचे अनुभव ऐकायचे, सरकारी स्तरावर या गोष्टींबद्दल असलेली अनास्था, ‘हरित क्रांती’पासून शेतीमध्ये नवनवे प्रयोग यशस्वी करणाऱ्या संशोधकांशी, अभ्यासकांशी चर्चा असा खूप तपशील जमा झाला होता.  त्यातून या शेतक ऱ्यांची गोष्ट सांगायची, पण तेही सिनेमाच्या भाषेत असली पाहिजे. त्याची मांडणी करणे ही अवघड गोष्ट होती, असे भाविन यांनी सांगितले. बेल्जियम, जर्मन, ब्राझिल, उत्तर अमेरिका अशा देशांमधून आपल्याकडच्या शेतक ऱ्यांबद्दल चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावरही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी ओम पुरी यांच्यासारखा हिंदी चित्रपटांबरोबरच २५ हॉलीवूडपटांचा अनुभवही गाठीशी असलेला समर्थ अभिनेता मिळावा यासारखा दुसरा आनंद असू शकत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
माझा चित्रपट हा आत्ताच्या असंवेदनशील, अतार्किक आणि गेल्या शंभर वर्षांमध्ये घोळवून घोळवून वापरलेल्या प्रेमत्रिकोण फॉम्र्युलांमधला नसावा हा विचार पक्का होता.
-भाविन वाडिया, दिग्दर्शक