ओम पुरी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी त्यांच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्याने त्यांच्या मृत्यूभोवती संशयाचे धुके निर्माण झाले होते. दरम्यान सोमवारी डॉक्टरांनी ओम पुरी यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल सादर केल्यानंतर हा संशय आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, ओमपुरी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे आणि मानेचे हाड तसेच डाव्या खांद्याला फ्रॅक्चर असल्याचे समोर आले आहे. ओम पुरी यांचे शुक्रवारी ह्रदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झाले होते. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत संशयाचे धुके निर्माण झाले होते.

ओम पुरी यांच्या डोक्याला झालेली जखम दिड इंच खोल आणि ४ सेमी लांब इतकी होती. तसेच मानेचे हाड आणि डाव्या खांद्याला देखील फ्रॅक्चरअसल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. या अहवालानुसार, पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पुरी ज्या इमार तीमध्ये राहत होते, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील तपास करण्यात येत असून ओम पुरी यांना मृत्यूपूर्वी २४ तास अगोदर जे लोक भेटण्यासाठी आले होते, या लोकांची देखील चौकशी करण्यात येत असल्याची माहिती ओशिरा पोलिस स्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई मिररला दिली आहे.

पुरींचे निधन हे ह्रदयविकाराने झाल्याचा संशय होता. ह्रदयविकाराचा झटका बसल्यानंतर जमिनीवर कोसळल्यामुळे देखील त्यांना इजा झाली असण्याची शक्यता यापूर्वी पोलिस अधिकाऱ्याने वर्तविली होती. ओम पुरी यांच्या घरामध्ये कोणतीही संशयास्पद गोष्ट मिळाली नसल्यामुळे आम्ही प्रक्रियेनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अशी माहिती देखील पोलिसांनी दिली होती. ओम पुरी अंधेरीतील निवासस्थानी एकटेच राहत होते. त्यांना दुसऱ्यांदा ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी काही कामानिमित्त त्यांना बाहेर नेण्यासाठी आलेल्या त्यांच्या वाहनचालकाला पहिल्यांदा त्यांचे निधन झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, त्यांच्या शरीरावर काही जखमाही आढळून आल्याने संशय निर्माण झाला. यावरुन तर्कवितर्कांनाही उधाण आले असून शवविच्छेदन अहवालामधील फ्रॅक्चर आणि डोकाल्या झालेली गंभीर दुखापतींचा काय निष्कर्ष लागणार हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल. शुक्रवारी सायंकाळी उशिरा ओशिवरा येथील स्मशानभूमीत ओम पुरी यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले होते. यावेळी त्यांच्याबरोबर काम केलेल्या अनेक कलाकारांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.