अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या भोवती असणारं चाहत्यांचं वलय हे आता सर्वांनाच ठाऊक झाल आहे. विविध चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या किंग खानच्या चाहत्यांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. पण, कधीकधी चाहत्यांचं हे प्रेम अनेकांच्या भुवया उंचावायलाही कारणीभूत ठरतं यात शंकाच नाही. शाहरुखचा एखादा चित्रपट जरी प्रदर्शित होणार आहे असं म्हटलं तरीही चाहते भलतेच उत्सुक दिसतात. असंच काहीसं सध्या किंग खानसोबत झालं आहे. हैद्राबादमधील एका चित्रपटगृहामध्ये ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाचा शो सुरु असतानाच त्याची एन्ट्री होताच प्रेक्षकांनी पडद्यावर अक्षरश: पैसे उडविल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेऊनही शाहरुखच्या चाहत्यांवर त्याचा तिळमात्र परिणाम झाल्याचे दिसत नाहीये. ही बाब सध्या अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे. किंग खानच्याच एका चाहत्याने हा व्हिडिओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. खुद्द शाहरुखने सुद्धा हा व्हिडिओ पाहून ट्विटरद्वारे त्याची प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांद्वारे ही गोष्ट शाहरुखपर्यंत पोहोचताच त्याने याबाबत व्यक्त होत एक ट्विट केले. शाहरुख खानच्या चाहत्यांच्या ‘फॅनगिरी’ची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या वेळीही असाच एक प्रसंग घडला होता. या चित्रपटामध्ये शाहरुखने ऐश्वर्या रायच्या म्हणजेच ‘सबा’च्या पतीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये शाहरुख अवघ्या काही मिनिटांसाठी दिसला होता. पण त्याची एन्ट्री होताच काही अतिउत्साही प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्येच फटाके वाजवले होते. त्यामुळे चित्रपटगृहाचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आले होते. चाहत्यांचे प्रेम कधीकधी हद्द पार करु शकते याचेच हे उदाहरण आहे.

असो….सध्यातरी किंग खानचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘डिअर जिंदगी’ चांगलीच कमाई करत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि किंग खान यांच्या या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. आपल्या नेहमीच्या रुपापेक्षा वेगळ्या धाटणीची भूमिका शाहरुख खान या चित्रपटातून साकारत आहे. एका मानसोपचार तज्ज्ञाच्या म्हणजेच ‘जहांगीर खान’च्या भूमिकेद्वारे शाहरुख प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. या चित्रपटातील आलियाने साकारलेल्या ‘कायरा’च्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळतेय. त्यामुळे येत्या काळात १०० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाला स्थान मिळविण्यात यश मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.