६५ व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी पार पडला. मात्र या पुरस्कारांच्या वितरणापूर्वीच नवा वाद निर्माण झाला होता. काल वितरीत झालेले पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वितरीत न होता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते होणार असल्याचे समजताच पुरस्कार विजेता वर्गातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. यातच गायिका साशा तिरुपती हिनेही या वादात उडी घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार न मिळाल्यानं मला अत्यंत अपमानास्पद वाटलं,’ अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला.

 

‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘ओके जानू’  यांसारख्या चित्रपटातील गाजलेल्या गाण्यांना आपला आवाज देणा-या साशाने काल घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण न होणे ही अत्यंत अपमानास्पद गोष्ट असल्याचे तिने स्पष्ट केले. काही निवड कलाकारांनाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे समजताच पुरस्कार विजेत्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यानंतर ५०हून अधिक विजेत्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. पुरस्कार न स्वीकारणा-यांच्याच यादीमध्ये साशाचा देखील समावेश आहे.

 

मणि रत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कात्रू वेलियीदाई’ या चित्रपटातील ‘वान वरुवान’ या गाण्यासाठी साशाला सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता. तर याच गाण्यासाठी संगीतकार ए आर रहमान यांनादेखील संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘घडलेल्या प्रकारामुळे मला अत्यंत अपमानित झाल्यासारखे वाटत आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी माझ्यात प्रचंड उत्सुकता होती. मला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार हे ऐकूनच माझे वडील खूश झाले होते. या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्लीला येणार होते. मात्र बरं झालं ते आले नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया साशाने दिली.

दरम्यान, घडलेल्या प्रकारावरुन काहींनी या घटनेचा निषेध नोंदविला तर काहींनी पाठिंबा दिला. य़ात ज्येष्ठ कलाकार नान पाटेकर आणि विक्रम गोखले यांनी देखील या घटनेला पाठिंबा दिल्याचे दिसून आले.