13 November 2019

News Flash

राजधानीत रंगली सूर-कोजागरी!

राजधानीत मराठी मंडळांतर्फे कोजागरीनिमित्त संगीताचे कार्यक्रम झाले.

(निवेदिता मदाने-वैशंपायन)
राजधानीत मराठी मंडळांतर्फे कोजागरीनिमित्त संगीताचे कार्यक्रम झाले. रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत सूर-कोजागरी रंगली. पहाडगंज येथील बृहन्महाराष्ट्र संस्था ही दिल्लीतील सर्वाधिक जुन्या मराठी मंडळांपकी एक. या संस्थेतर्फे कोजागरीनिमित्त ग्वाल्हेर घराण्याचे पं. अमरेंद्र धनेश्वर यांचा रागदारी हा कार्यक्रम रंगला. यानिमित्ताने बऱ्याच दिवसांनी दिल्लीत आलेले पं. धनेश्वर यांनी मराठी भावसंगीताच्या सुवर्णकाळाची सफर रसिकांना घडवून आणली. त्यांना मुक्ता रास्ते यांनी तबल्यावर, तर दिल्ली आकाशवाणीचे कमाल अहमद यांनी सारंगीवर तोलामोलाची साथसंगत केली. लीली सामंत यांनी सूत्रसंचालन केले.
एखादे प्रसिद्ध गाणे आपल्या ओठांवर रेंगाळत असते. मात्र ते अमुक रागातील आहे हे आपल्याला माहिती नसते. धनेश्वर यांनी नेमकी हीच गोष्ट सांगून त्या त्या रागातील ‘मोरा जोबना नयेरगा’, ‘ना म बंधा ना म मुक्ता’, ‘सुनियो बालम मोरा’, ‘बिजली चमके बरसे नन’ इत्यादी रचनांची व बंदिशींची झलकही पेश केल्याने रसिकांच्या आनंदात भर पडली. यानिमित्ताने मराठी भावसंगीत समृद्ध करणारे जी.एन. जोशी, पु.ल. देशपांडे, सरस्वती राणे, मधुबाला जव्हेरी, ज्योत्स्ना भोळे, अरुण दाते, माणिक वर्मा, स्नेहल भाटकर आणि स्वराकाशातील सूर्य-चंद्र म्हणजेच लता मंगेशकर-आशा भोसले यांच्या आवाजातील अनेकानेक दुर्मीळ मराठी गीतांचा खजिनाच त्यांनी रसिकांसमोर उलगडला. राग यमन (‘तिन्हीसांजा’, ‘त्या कातरवेळी’, ‘अजून त्या झुडपांच्या मागे’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘नववधू प्रिया मी’), कलावती (‘दे मला गे चंद्रिके’, ‘प्रथम तुज पाहता’), पूरिया कल्याण (‘हरवले ते गवसले का’, ‘क्षणभर उघड नयन देवा’), मारवा (‘स्वरगंगेच्या काठावरती’), मांड (‘नदीकिनारी’, ‘जा घेऊनी संदेश पाखरा’, ‘अंगणात राहिले’), नंद (‘माझिया माहेरा जा’), मिया की मल्हार (‘जन पळभर म्हणतील’), मालकंस (‘निजल्या तान्यावरी माऊली’) तसेच भरवी (‘वाजीव रे मुरली’) अशा जुन्या उत्तमोत्तम गाण्यांचा नजराणा सादर केला. ही दुर्मीळ गीते गुणगुणत व कोजागरीनिमित्त दिलेल्या आटीव केशर दुधाचा स्वाद मनामनांत रेंगाळत ठेवूनच रसिक घरोघरी मार्गस्थ झाले.

First Published on November 1, 2015 12:51 am

Web Title: on okeshn of kojagiri purnima cultural program
टॅग Cultural Program