दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांनी ‘मैं हूं रजनिकांत’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने या चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर चित्रपटाच्या निर्मात्याने कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता आपल्या विविध चित्रपटांतील अभिव्यक्तींची नकल केली असल्याची याचिका रजनिकांत यांनी मद्रास उच्चन्यायालयात दाखल केली होती. यावर सुनावणी देताना, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने चित्रपटाचे प्रदर्शनाला स्थगिती देण्याचा अंतरिम हुकूम जारी केला आहे.
रजनिकांत यांची दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये असलेली सुपरहिरोच्या प्रतिमेची नकल या चित्रपटात करण्यात आल्याचे म्हटले गेले आहे. तसेच चित्रपटाच्या शिर्षकासाठीही निर्मात्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी मागितली नसल्याचेही रजनिकांत यांच्या याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मैं हूं रजनिकांत या चित्रपटात आदित्य मेनन आणि कविता राधेश्याम यांच्या मुख्य भुमिका असून दिग्दर्शक फैजल सैफ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.