बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या लव्ह लाइफमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने त्याने एखादी भेटवस्तू मलायकाला देण्याऐवजी १०० अशा जोडप्यांना मदत केली आहे जे कर्करोगाशी लढा देत आहेत.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुनची आई मोना शौरी यांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला होता. म्हणूनच त्याने सगळ्यांना कर्करोगाची माहिती देण्याचा आणि अशा लोकांना मदत करण्याचा निर्णन घेतला होता. त्यासाठी त्याने ‘कॅन्सर पेशंट्स अॅण्ड असोसिएशन’ (सीपीएए) यांच्या सोबत काम करण्याचे ठरवले आहे.

“करोना साथीच्या रोगाने आपल्या सर्वांना एकमेकांना मदत करणे शिकवले आहे. आपण सगळे आपल्या प्रिय लोकांसोबत व्हॅलेन्टाईन डे साजर करण्यासाठी उत्सुक असतो. पण मी यावेळी काही तरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला आहे” असं अर्जुन म्हणाला.

पुढे तो म्हणाला की,” ‘कॅन्सर पेशंट्स अॅण्ड असोसिएशन’ सोबत, मी कर्करोग झालेल्या १०० कपल्सला औषधोपचार घेण्यासाठी मदत करत आहे. तसेच एक व्यक्ती कर्करोगाशी झुंज देत असताना दुसरा साथीदार त्याच्या या लढाईत साथ देईल.”

अशा जोडप्यांसाठी अर्जुनने मदतीचा हात पुढे केला आहे. अर्जुन म्हणाला की, “केमोथेरपी आणि रेडिओथेरपी, शस्त्रक्रिया आणि औषध यासाठी प्रत्येक रूग्णाला १ वर्षाला लागणारा खर्च हा १ लाख रूपये इतका आहे. आपण त्यांना आर्थिक संकटांपासून वाचवू शकतो.”