बॉलीवूडची ‘खाना’वळ पन्नाशीतही नायकाची भूमिका करते म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते. गेली तीन वर्षे सलमान खान, शाहरूख खान आणि आमिर खान यांची तिकीटबारीवरील मक्तेदारी हळूहळू मोडून काढण्यासाठी निर्मात्यांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. दोन वर्षांपूर्वी आलेल्या नव्या पिढीतील कलाकारांनी तिकीटबारीवरचं गणित जमवून दाखवण्याच्या दृष्टीने थोडीशी आशा दाखवली होती खरी.. त्यांच्यावर भिस्त ठेवून निर्मात्यांचे एक वर्ष तसे सुखाचे गेलेही, मात्र या वर्षी बॉलीवूडला हमखास यशासाठी खान मंडळींचाच आधार घ्यावा लागला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टारची एकेक पिढी हळूहळू मागे पडते आणि नवी उदयाला येते हा आजवरचा अनुभव आहे. मात्र नव्वदच्या दशकात बॉलीवूडमध्ये दाखल झालेल्या आमिर, शाहरूख आणि सलमान खान यांनी आत्तापर्यंत आपली सद्दी कायम टिक वून ठेवली आहे. या वर्षी मोजून पाच ते सहा चित्रपट सुपरहिट झाले आहेत ज्यात दोन चित्रपट सलमान खानचे आहेत आणि एक शाहरूखचा आहे.

या वर्षीचा सर्वाधिक कमाईचे रेकॉर्ड मोडणारा चित्रपट म्हणून सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाची नोंद झाली आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ३१८.१४ कोटी रुपयांची कमाई केली, तर दिवाळीत आलेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ अर्थात प्रेमभाई १९०.०२ कोटी रुपये मिळवून सुपरहिट ठरला आहे. याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या शाहरूख खानच्या ‘दिलवाले’ने आत्ताच २१५ कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे याही वर्षी तिकीटबारीवर या दोघांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे.

या दोघांशिवाय संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’नेही आत्तापर्यंत १५२ कोटी रुपये मिळवले आहेत. अजून एक आठवडा त्यांच्या हातात असल्याने रणवीर या वर्षी कदाचित २०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेलही, पण हा चित्रपट संजय लीला भन्साळींचा म्हणूनच ओळखला जाणार. याशिवाय, कंगना राणावतच्या ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ या सीक्वेलपटाने १४८.४७ कोटी रुपयांची कमाई करत सुपरहिटच्या यादीत स्थान मिळवले असले तरी तिचा ‘कट्टी बट्टी’ सपशेल आपटल्यामुळे तिला त्याचा फायदा मिळणार नाही.

रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘एबीसीडी २’ हा सीक्वेलपटही शंभर कोटी रुपयांचा पल्ला पार करत सुपरहिटच्या यादीत येऊन बसला आहे; पण हे दोन्ही सीक्वेलपट असल्याने या चित्रपटांचे ते एकहाती यश असल्याचे म्हणता येत नाही. याचाच अर्थ या वर्षीही शंभर ते दोनशे कोटींच्या कमाईसाठी निर्मात्यांना या आघाडीच्या तीन खान मंडळींचाच आधार घ्यावा लागला आहे. या तिघांनाही ‘स्टारडम’चे जे सूत्र गवसले आहे त्यासाठी नवी पिढी अजूनही धडपडते आहे. रणबीर कपूर या शर्यतीत आघाडी घेईल, असा कयास होता. मात्र त्याचाही ‘बॉम्बे वेल्वेट’ सपाटून आपटल्याने त्याचीही गाडी मागे पडली. इम्तियाज अली दिग्दर्शित ‘तमाशा’ चित्रपटाने त्याला या वर्षी उभं राहण्यास मदत केली असली तरी हा चित्रपट वेगळ्या पठडीतील असल्याने त्यावरही ठसा इम्तियाजचाच आहे.

‘दम लगा के हैशा’, ‘एनएच १०’ आणि कपिल शर्माचा ‘किस किस को प्यार करूँ’ हा पदार्पणाचा चित्रपट, ‘प्यार का पंचनामा २’ याही चित्रपटांनी ‘हिट’ म्हणून यश मिळवले असले तरी त्यांची कमाई ही पन्नास कोटी रुपयांच्याच घरात असल्याने त्याचा तिकीटबारीवर फारसा फरक पडणार नाही.

बाकी वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर हे या वर्षी फारशी चमक दाखवू शकलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलीवूडची सूत्रे नव्या पिढीच्या हाती जाण्याऐवजी ‘खाना’वळीच्याच हातात राहिली आहे.