एकाच दिवशी दोन, तीन किंवा अधिक चित्रपट प्रदर्शित करून एकमेकांच्या पायात पाय घालण्याचा प्रकार या शुक्रवारी पुन्हा एकदा घडणार आहे. गेल्या वर्षीही एकाच दिवशी पाच मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. यंदाही तीन मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने पुन्हा एकदा ‘तीन तिघाडा’ होणार आहे. १३ जून रोजी ‘एकता – एक पॉवर’, भातुकली’, जयजयकार’ हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एकाच दिवशी ‘येडा’, ‘चिंट-२’, ‘टुरिंग टॉकिज’, ‘कुरुक्षेत्र’ आणि ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हे पाच चित्रपट तर जून महिन्यात ‘पॉवर’, भुताचा हनिमून’ आणि झपाटलेला-२’ हे तीन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते.
एकाच दिवशी एकापेक्षा जास्त मराठी चित्रपट प्रदर्शित करू नयेत, त्याचा फटका मराठी चित्रपटांनाच बसतो, अशी चर्चा या अगोदरही झाली होती. असे झाल्याने चित्रपटाच्या वेळा, चित्रपटगृहे आणि प्रेक्षक यांची विभागणी होते. परिणामी कोणत्याच चित्रपटाला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
त्यामुळे मराठी चित्रपट निर्मात्यांनी एकत्र येऊन, चर्चा करून तारतम्य दाखवावे आणि एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित करणे टाळावे अशी चर्चा होत असते. पण त्यातून ठोस मार्ग निघत नसल्याचे आता पुन्हा एकदा समोर आले आहे.मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना योग्य स्थान मिळत नाही, अशी ओरड नेहमी होते. एका मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळणे अवघड असताना एकाच वेळी अधिक चित्रपट प्रदर्शित झाले तर अडचणी आणखी वाढणारच आहेत.
२५ एप्रिल- धमक, पोस्टकार्ड, कॅपेचिनो, आदित्य विरुद्ध आदित्य १ मे २०१४- दुसरी गोष्ट आणि सलाम हे चित्रपट यंदा यापूर्वी एकाच दिवशी प्रदर्शित झालेले चित्रपट होते.