News Flash

चित्रपट सेन्सॉरसंमत झाल्यानंतरही दिग्दर्शकाला अडचणीत आणणे चुकीचे – महेश भट्ट

चित्रपट सेन्सॉरकडून प्रमाणित झाल्यानंतरही आक्षेपार्ह आशयाच्या नावाखाली प्रदर्शनासाठी अडथळे आणले जातात.

| January 13, 2015 07:52 am

चित्रपट सेन्सॉरकडून प्रमाणित झाल्यानंतरही आक्षेपार्ह आशयाच्या नावाखाली प्रदर्शनासाठी अडथळे आणले जातात. आमचा चित्रपट प्रदर्शित करू द्या, असे वेगवेगळ्या लोकांना भेटून दिग्दर्शकाला अजीजी करावी लागणे चुकीचे आहे, असे सांगत दिग्दर्शक महेश भट्ट यांनी छोटय़ा-मोठय़ा कारणांवरून चित्रपटांवर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्या लोकांवर टीका केली आहे. भट्ट कॅम्पचा ‘खामोशियाँ’ हा चित्रपट जानेवारी अखेरीस प्रदर्शित होतो आहे. त्यानिमित्ताने एकूणच चित्रपटाच्या प्रसिद्धी प्रक्रियेत महेश भट्ट यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
‘पीके’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जनहित याचिका दाखल कर, चित्रपटगृहातील प्रदर्शनावर बंदी आण, अशा अनेक मार्गानी अडथळे निर्माण केले जात आहेत. मात्र, ज्याअर्थी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिले आहे त्याअर्थी त्याच्यात आक्षेपार्ह असे काही नाही हे वास्तव आहे. तरीसुद्धा एखाद्याला चित्रपट योग्य वाटत नसेल तर त्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कायदेशीर मार्गाने त्यांचे म्हणणे मांडावे. हिंसक मार्गाने चित्रपट बंद पाडणे हे सभ्य समाजाला शोभा देत नाही, असे महेश भट्ट यांनी सांगितले. एका गॅपनंतर पटकथा लेखन, चित्रपटाचे प्रसिद्धी व्यवस्थापन यात महेश भट्ट यांनी पुन्हा लक्ष घातले आहे. थरारपटांचा एक प्रेक्षकवर्ग नक्कीच आहे. त्याच थरारपटांच्या पठडीतला पण, पूर्णत: नव्या पद्धतीने केलेला असा चित्रपट असल्याने ‘खामोशियाँ’ हा आपल्यासाठी खास चित्रपट असल्याचे महेश भट्ट यांनी सांगितले.
चित्रपटांची गाणी ही भट्ट कॅम्पच्या चित्रपटांची खासियत राहिली आहे. ‘खामोशियाँ’च्या निमित्ताने गाण्यांच्या स्वतंत्र अल्बमची निर्मिती आपण केली असल्याचे त्यांनी सांगितले.
‘आशिकी २’ हिट झाल्यानंतर ऐंशीच्या दशकात जसे संगीतमय चित्रपट आले होते तसे चित्रपट पुन्हा लोकांना आवडू लागले आहेत असे आपल्याला वाटत असल्याचे ते म्हणतात. ‘खामोशियाँ’ हा त्या अर्थाने संगीतमय चित्रपट नाही. पण, गाणी हा त्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाच्या दिग्दर्शकापासून कलाकारांपर्यंत सर्वच टीम नवीन आहे. मात्र, नवे कलाकार आणि दिग्दर्शकांबरोबर काम करताना जास्त समाधान मिळते, असे त्यांनी सांगितले.
‘खामोशियाँ’मध्ये अली फझल, छोटय़ा पडद्यावरचा स्टार अभिनेता गुरमीत चौधरी आणि नवोदित सपना पाबी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अलीने याआधी चांगल्या बॅनरचे चित्रपट केले आहेत त्यामुळे तो नवोदित नाही. मात्र, तो पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. सपना पाबी आणि गुरमीतचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि दिग्दर्शक म्हणून करण दाराचाही हा पहिलाच चित्रपट आहे. मात्र, नवी पिढी आपल्या कामात आणि अभिनयात सरस आहे. एखाद्या नवजात तान्ह्य़ा बालकाला पाहिल्यानंतर जी ऊर्जा आपल्याला मिळते तशीच ऊर्जा या टीमच्या ‘खामोशियाँ’ चित्रपटात पाहायला मिळेल, असा विश्वास महेश भट्ट यांनी व्यक्त केला. 

– रेश्मा राईकवार, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 7:52 am

Web Title: once film gets the sensor certificate then turning the director is wrong says mahesh bhatt
Next Stories
1 सलमान-शाहरूखच्या ‘करण अर्जुन’ला २० वर्षे पूर्ण!
2 गोल्डन ग्लोब पुरस्कारात बॉयहूड, बुडापेस्ट यांची बाजी
3 ‘मेसेंजर ऑफ गॉड’ला सेन्सॉर बोर्डाचा दणका, प्रदर्शनावर बंदी
Just Now!
X