मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट तयार होत असतात. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळताना नरेश बिडकर यांनीही अशाच एका नाविन्यपूर्ण विषयावर ‘Once मोअर’ हा चित्रपट तयार केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये कलाकारांची मांदियाळा पाहायला मिळणार असून एका नव्या कलाकाराच प्रथमच चित्रपटसृष्टीत पदार्पण होणार आहे.

‘Once मोअर’ हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटातून पहिल्यांदाच आशुतोष पत्की हा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा असून हा त्याचा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे.
बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या आशुतोषचं अभिनय हे पॅशन आहे. त्यामुळे तो थेट अभिनयाकडे वळला आहे. अशुतोषने अनुपम खेर अॅकॅडमीमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतल असून यापूर्वी तो ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचला आहे.

‘गाणं आणि संगीत मी बालपणापासूनच ऐकत आलो आहे. मात्र तरीदेखील माझ मन अभिनय क्षेत्राकडेच वळत होतं. अभिनय हे माझं पॅशन आहे. त्यामुळे बाबांनीही मला कधीच गायनक्षेत्राकडे जाण्यासाठी आग्रह केला. उलट ते कायमच मला माझ्या आवडीच्या क्षेत्राकडे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहिले. त्यामुळे हा चित्रपटही मला त्यांच्यामुळेच मिळाला आहे’, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.

दरम्यान, या चित्रपटामध्ये आशुतोषसोबत धनश्री दळवी हा नवा चेहरा दिसणार आहे. यांच्या जोडीला रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार हे मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी कलाकारही दिसून येणार आहेत.