काही वर्षांपूर्वी हर्बेरियम उपक्रमाद्वारे पाच गाजलेली जुनी नाटके आजच्या आघाडीच्या दिग्दर्शकांकरवी नामवंत कलाकारांच्या संचात आणि मोजक्याच प्रयोगांत रंगभूमीवर आणण्याचा अभिनव उपक्रम राबविणाऱ्या अभिनेते सुनील बर्वे यांनी पुनश्च असाच एक अभिनव उपक्रम योजिला आहे. पुण्यातील फिरोदिया करंडक एकांकिका स्पर्धेत हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून एकांकिका सादर करण्याची अट असते. त्यानुसार चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, अ‍ॅनिमेशन आदी कलांचा एकत्रित आविष्कार असलेल्या एकांकिकाच या स्पर्धेत सादर करता येतात.
या एकांकिका स्पर्धेचे परीक्षक म्हणून गेलेल्या सुनील बर्वे यांना ही कल्पना प्रचंड भावली आणि त्यांनी आपल्या ‘सुबक’ उपक्रमांतर्गत त्यातल्या दोन एकांकिका मुंबई व ठाणेकरांना दाखवायचे ठरविले आहे.
त्यानुसार फिरोजिया करंडक विजेत्या ठरलेल्या व्हीआयटी कॉलेजची ‘पाणी’ आणि फग्र्युसन कॉलेजची ‘विठा’ या दोन एकांकिकांचे एकत्रित प्रयोग शनिवार, ६ जून रोजी दुपारी ४ वा. यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा आणि रात्री ८.३० वा. ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात सादर होणार आहेत. ‘पाणी’मध्ये एका नक्षलग्रस्त गावातील पाण्याची भीषण्र समस्या मांडण्यात आली आहे, तर ‘विठा’ ही एकांकिका जुन्या जमान्यातील सुप्रसिद्ध तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनपटावर आधारित आहे.
या दोन्ही एकांकिकांमध्ये मिळून तब्बल ५० कलावंत आहेत. एकांकिकेतील घटिताशी निगडित अन्य कलांचा अप्रतिम वापर कशा प्रकारे करता येऊ शकतो, याचा प्रत्यय यानिमित्ताने रसिकांना येईल, अशी सुनील बर्वे यांची अपेक्षा आहे.