दाक्षिणात्य कलाकार आणि त्यांच्या चित्रपटांच्या विविध चर्चा नेहमीच रंगत असतात. चित्रपटसृष्टीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचे नवनवीन विक्रम बनतच असतात. पण, काही कलाकार मात्र या विक्रमांच्याही पलीकडे जाऊन त्यांच्या चाहत्यांवर एका वेगळ्याच प्रकारचा प्रभाव पाडला आहे. तशीच काहीशी घटना आता अभिनेता चिरंजीवीसोबत घडल्याचे पाहायला मिळत आहे. बऱ्याच काळानंतर अभिनेता चिरंजीवी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘खिलाडी नं. १५०’ हा चिरंजीवी यांचा आगामी चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासंबंधीची उल्लेखनीय बाब म्हणजे आखाती राष्ट्रांच्या अनेक बांधकाम कंपन्या आणि इतर सर्वच प्रकारच्या कंपन्यांनी या चित्रपटासाठी जाहीर सुट्टीची घोषणा केली आहे.

अभिनेता चिरंजीवीची मुख्य भूमिका असणारा ‘खिलाडी नं. १५०’ हा चित्रपट भारतासह आखाती राष्ट्रांमधील जवळपास ५०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, ‘दुबई’ चिरंजीवी फॅन असोशिएशन’चे अध्यक्ष ओरुंगति सुब्रमण्यम शर्मा यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, ‘आम्ही नोवो चित्रपटगृहामध्ये ११ जानेवारीच्या पहिल्या शोचीसुद्धा सर्वच तिकीटे बुक केली आहेत’. सौदी अरबमध्ये जरी एकच चित्रपटगृह असले तरीही उर्वरित सर्वच आखाती राष्ट्रांमध्ये चिरंजीवीचा हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

chiranjeevi-image-670

नवभारत टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रियादच्या बांधकाम कंपनीतील एका कामगाराच्या म्हणण्यानुसार ‘हा क्षण आमच्यासाठी एका सणाप्रमाणेच आहे. आम्हा सर्वांचा आवडता अभिनेता १० वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. या क्षणाची आम्ही गेल्या बऱ्याच काळापासून वाट पाहात होतो’. चिरंजीवीच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यातही या सुपरहिट अभिनेत्याचा हा १५० वा चित्रपट असल्यामुळे आखाती राष्ट्रांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.