एखाद्या उंच इमारतीवरून किंवा झाडाच्या शेंडय़ावरून एखादं पांढरंशुभ्र पीस हलकेच खाली घरंगळताना लहानपणी आपण अनेकदा टक लावून पाहिलं असतं. एवढय़ा उंचीवरून हळूहळू तरंगत ते पीस अलगद आपल्याच हातावर येऊन विसावावं, असं मनातल्या मनात वाटलेलं असतं. उंचावरून अळुमाळु हेलकावे खात ते पीस खाली येताना आपल्या पोटात चांगलाच खड्डा पडलेला असतो. अखेर ते पीस आपल्या हातावर येऊन हळुवारपणे थांबल्यावर आपल्या पोटातला तो खड्डा नाहीसा झाल्यासारखं आणि जीव भांडय़ात पडल्यासारखं वाटलेलं असतं. ‘प्रेमाची गोष्ट’ पाहतानाही नेमका तोच अनुभव येतो. पण या गोष्टीच्या माध्यमातून दिग्दर्शकाने प्रेक्षकांच्या हाती केवळ मुलायम पीसच दिलं नसून नातेसंबंधांतील बदल, आजच्या काळानुसार बदलणारे नात्यांचे संदर्भ यांचा गुंताही ठेवला आहे. ज्याला जसा हवा, त्याने तो तसा उलगडावा!
ही गोष्ट सुरू होते तीच कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात असलेल्या मानसोपचार तज्ज्ञांसमोर बसलेल्या राम (अतुल कुलकर्णी) आणि रागिणी (सुलेखा तळवलकर) यांच्यापासून. लग्नानंतर दोनच वर्षांत लेखन क्षेत्रात अयशस्वी ठरलेल्या रामला कंटाळलेल्या रागिणीला घटस्फोट हवा आहे. दोन अयशस्वी माणसं एकत्र येऊन एक यशस्वी आयुष्य जगूच शकत नाहीत, या तिच्या मतावर ती ठाम आहे. राम मात्र तिच्यासाठी थांबायला, तिला वेळ द्यायला तयार आहे. पण ती अजिबातच तयार नाही.
याच कौटुंबिक न्यायालयात आपल्या दुसऱ्या नवऱ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी सोनलही (सागरिका घाटगे) येते. अगदी अपघातानेच राम तिच्या मांडीवर बसतो आणि त्यांचं छानपैकी भांडण होतं. मग हळूहळू गप्पा होतात. त्या वेळी राम तिला नात्यांबद्दलची त्याची ‘फिलॉसॉफी’ ऐकवतो, तर सोनलही त्याला आपली मतं ठणकावून सांगते. पुढे एका वळणावर हे दोघंही एकमेकांना प्रदीर्घ काळासाठी भेटतात. दाक्षिणात्य चित्रपटांच्या कथांवर मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिणाऱ्या रामला एका मदतनीसाची गरज असते आणि त्या जागेसाठी नेमकी सोनल मुलाखत द्यायला येते.
राम आणि सोनल कामाच्या निमित्ताने सतत भेटत राहतात. त्यांच्यात गप्पा होतात, सोनलला रामचा सच्चेपणा खूप भावतो, तर रामलाही सोनल मनापासून आवडायला लागते. पण पहिल्याच भेटीत एकमेकांना ऐकवलेल्या तत्त्वज्ञानामुळे दोघंही आपल्या प्रेमाची कबुली द्यायला तयारच नसतात. एकीकडे रामची आई (रोहिणी हट्टंगडी) रामला, रागिणीला विसरून जाण्याबद्दल सांगत असते, तर दुसऱ्या बाजूला त्याचा मित्र स्वराज (सतीश राजवाडे) याला सोनल आणि राममधली वाढती जवळीक समजत असते. सोनलची मैत्रीण मीरा (मीरा वेलणकर) हिलादेखील या हळुवार बंधाची जाणीव झालेली असते. पण ‘नातं तुटलं तरी प्रेम कायम राहतं’ या रामने ऐकवलेल्या तत्त्वज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी सोनल आपल्या नवऱ्याकडे राहायला परत जाते. तर दुसऱ्या बाजूला रागिणी रामकडे परत येण्यासाठी उत्सुक असते. अशा परिस्थितीत राम आणि सोनल एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देतात का, रागिणीचं काय होतं, सोनलच्या नवऱ्याचं काय होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला आणि परंपरेमुळे लग्नसंस्थेबाबत आपल्या डोळ्यांवर बसलेली झापडं एकदा तरी उडवायला हा चित्रपट पाहणं अत्यंत जरुरी आहे.
या चित्रपटाची मोठी जमेची बाजू म्हणजे कथा, पटकथा आणि संवाद. सतीश राजवाडेची ही एक साधी, सरळ आणि सोपी गोष्ट चिन्मय केळकरने तेवढय़ाच साध्या, सरळ आणि सोप्या पद्धतीने मांडली आहे. काही काही संवाद तर चिन्मयच्या लेखणीतील चमक दाखवून जातात. रामच्या आईच्या तोंडी आलेलं ‘नातं नुसतंच ओढत राहिलं, तर संसार होईल. सहवास नाही’, हे वाक्य किंवा ‘नातं संपलं, तरी प्रेम कायम राहतं’ हे रामच्या तोंडचं वाक्य अशा अनेक आशयगर्भ संवादांची पखरण चित्रपटभर साथसंगत करत राहते. लग्नसंस्थेच्या उदात्तीकरणाचा मोहदेखील लेखकाने टाळला आहेच पण घटस्फोटासारख्या स्फोटक विषयावर हा चित्रपट बेतलेला असूनही तो कुठेही प्रचारकी थाटाचा किंवा उपदेशाचे डोस पाजणारा नाही. पण तरीही दिग्दर्शकाला हवा तो संदेश योग्य प्रकारे पोहोचतोही.
सतीश राजवाडेचं दिग्दर्शन मराठी प्रेक्षकांना नवीन नाही. पण तरीही या चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्यातल्या दिग्दर्शकाचा टवटवीतपणा नव्याने भिडतो. रामच्या मनात गोंधळ असल्यानंतर त्याचं समुद्रावर जाणं, सोनलने पहिल्यांदाच पटकथा लिहिण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच वेळी स्वराजचं तिथे येणं, परस्परविरोधी विचारांमध्ये अडकलेला असतानाच त्याचं किल्ली विसरणं, पटकथेच्या माध्यमातून राम-रागिणी-सोनल या तिघांच्या नातेसंबंधांवर भाष्य करणं, या सगळ्याच गोष्टींमध्ये त्याच्यातला दिग्दर्शक मस्त समोर येतो.
या चित्रपटातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाचा टवटवीत आणि अत्यंत ‘ब्राइट’ चेहरा! कला दिग्दर्शकांनी सजवलेलं लेखकाचं ऑफिस, किंवा त्याचं घर, सोनलच्या मैत्रिणीचं घर अत्यंत आल्हाददायक आहे. तसंच सोनल रामला तिने पहिल्यांदाच लिहिलेला सीन ऐकवते त्या वेळचं लोकेशनही खूप मस्तच निवडलंय. कपडय़ांच्या बाबतीतही ही गोष्ट तंतोतंत लागू होते. रागिणीचे भडक कपडे तिच्या भूमिकेला शोभणारेच आहेत. त्याचप्रमाणे रामने मध्यंतरापर्यंत घातलेले कपडे आणि रामला सोनलबद्दल आकर्षण वाटायला लागल्यानंतर त्याच्या कपडय़ांमध्ये झालेला बदलही जाणवतो. सोनलचे कपडेही ‘ब्राइट’ रंगांचे ठेवून तिच्या पात्राला न्याय दिला आहे.
एखाद्या रोमॅण्टिक चित्रपटाचं संगीत जसं असावं, तसंच या चित्रपटाचं संगीतही अत्यंत श्रवणीय आणि गोड आहे. विशेषत: ‘ओल्या सांजवेळी’ हे गाणं घेऊनच प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडतील. कैलाश खेर यांनी गायलेलं गाणंही त्या प्रसंगासाठी उत्तम जमलं आहे. या चित्रपटात संगीत कथेला अत्यंत पूरक असं काम करतं, आणि तेच त्याचं यश आहे.
अतुल कुलकर्णी या कलाकाराला काय म्हणावं, तेच कळत नाही. प्रेमकथा हा काही रूढार्थाने त्याचा प्रांत नाही. पण त्याच्यातल्या कसदार अभिनेत्यानं हे आव्हान लीलया पेललं आहे. चित्रपटभर त्याचा वावर अत्यंत सहज आहे. तो अभिनय करतो, असं वाटतच नाही. राम सुब्रह्मण्यम हे लेखकाचं पात्र त्याने कमालीच्या संयमाने उभं केलं आहे. बांधीलकी, नातं, प्रेम यांवरचा त्याचा विश्वास, त्याचा सच्चेपणा हे सगळं खूपच वास्तववादी वाटतं. त्याच्यासमोर उभ्या राहिलेल्या आणि मराठीत पदार्पण करणाऱ्या सागरिकाच्या अभिनयात मराठी येत नसल्याची भीती दिसते. पण तरीही तिने सोनलचं पात्र यशस्वीपणे उभं केलं आहे. ही मुलगी चित्रपट पाडणार, असं सुरुवातीला वाटतं. पण नंतर ती अतुलसमोर खूपच प्रगल्भपणे उभी राहिली आहे. पण तिची संवादफेक मराठी कानांना आपलीशी वाटत नाही. सुलेखा तळवलकरने आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तुसडेपणा आणून रागिणी झोकात उभी केली आहे. तसंच स्वत:ची चूक उमगल्यानंतर तिचा अभिनयही खूप चांगला आहे. रोहिणी हट्टंगडी आणि सतीश राजवाडे या दोघांनी आपल्या भूमिका चोख केल्या आहेत. मुलाच्या विस्कळीत संसारामुळे काळजीत पडलेली आई, मुलाला टोचून बोलणाऱ्या सुनेला टोमणे मारणारी सासू आणि मुलाच्या अत्यंत जवळच्या मित्रालाही मुलासारखाच वागवणारी काकू या सगळ्याच ‘शेड्स’ रोहिणीताईंनी खूप परिणामकारकपणे दाखवल्या आहेत. ‘प्रेमाची गोष्ट’ हा एक दर्शनीय अनुभव आहे. तो प्रत्येकाने घ्यायलाच हवा. मनोरंजनाबरोबरच सतीशने ज्या विचाराने ही गोष्ट लिहिली आहे, तो विचार नक्कीच कुठेतरी झिरपतो. हेच या चित्रपटाचं सगळ्यात मोठं यश आहे.
मिराह एण्टरटेन्मेण्ट प्रा. लि. प्रस्तुत
इहिता एण्टरप्राइझेस निर्मित
प्रेमाची गोष्ट
दिग्दर्शक/ कथा – सतीश राजवाडे
पटकथा व संवाद – चिन्मय केळकर
छायांकन – सुहास गुजराथी
कलाकार – अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे, सुलेखा तळवलकर, रोहिणी हट्टंगडी, सतीश राजवाडे, मीरा वेलणकर आणि इतर.