महेश एलकुंचवारलिखित ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा रंगमंचावर सादर होत असून ८ नोव्हेंबर रोजी रवींद्र नाटय़ मंदिर येथे दुपारी चार वाजता नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर सादर झाले होते. चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
राज्य शासनाच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे ८ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत रवींद्र नाटय़ मंदिर येथे पु. ल. देशपांडे युवा कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘वाडा चिरेबंदी’ चा प्रयोग सादर होणार असून त्यासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. नाटय़गृहातील काही आसने राखीव ठेवण्यात आली असून ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वावर प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. जिगिषा आणि अष्टविनायक निर्मित या नाटकात निवेदिता जोशी, वैभव मांगले, प्रसाद ओक, भारती पाटील यांच्यासह सिद्धेश्वर झाडबुके, नेहा जोशी, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, विनिता शिंदे, अजिंक्य ननावरे हे कलाकार आहेत. हे नाटक रंगभूमीवर पहिल्यांदा सादर झाले त्या प्रयोगाचे दिग्दर्शन विजया मेहता यांनी केले होते.
काही वर्षांनंतर एलकुंचवार यांनी याच नाटकाचे ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’ असे पुढील भाग लिहिले. १९९४ मध्ये चंद्रकांत कुलकर्णी यांनीच ही तीनही नाटके एकत्र करून ‘त्रिनाटय़धारा’ असे आठ तासांचे महानाटय़ सादर केले होते.
आता चंद्रकांत कुलकर्णी पुन्हा एकदा यातील पहिले नाटक अर्थात ‘वाडा चिरेबंदी’ घेऊन रसिकांपुढे येत आहेत.  हे नाटक जेव्हा सादर झाले तेव्हा त्याचे जतन (डॉक्युमेंटेशन) केले गेले नव्हते. नव्या पिढीपर्यंत हे नाटक पोहोचावे, या उद्देशाने पुन्हा एकदा ‘वाडा चिरेबंदी’सादर करण्याचे आव्हान दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी पेलले आहे.