आज नेमकं काय होणारेय? नाटक..? ते पण फक्त पंधरा मिनिटं? कसं काय? बरं, आणि जाहिरातीत तर लिहिलंय- ‘कदाचित फक्त एकच प्रयोग!’ खरंय का ते?

ही काळी, चौकोनी जाहिरात पाहून सगळे कुतूहलापोटी शनिवारातल्या कै. नरेंद्र दाभोलकर यांच्या ‘साधना’ कार्यालयामागच्या प्रायोगिक नाटकासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुदर्शन रंगमंचला आले होते. ‘कदाचित एकच प्रयोग’ होणाऱ्या एका प्रयोगाला! सगळ्यांच्यात कुजबूज सुरू झाली. सुदर्शनला सातत्याने प्रायोगिक नाटकं होत असतात. एका वेळी फार तर दीडशे प्रेक्षक इथे नाटक पाहू शकतात. कोंबले तर एकशे सत्तर!
स्टेजवर मध्यात पांढरा फ्लेक्स अंथरलेला. त्यावर एक पांढरी प्लास्टिक खुर्ची. स्टेजच्या दोन्ही बाजूंना पुढे दोन पांढरे प्रोजेक्टर स्क्रीन टांगलेले. साडेसात वाजले. सगळे कुतूहलपूर्ण नजरेने मंचावरील नेपथ्यातून काहीएक अर्थ काढू पाहत होते. मग अळम्टळम् गप्पा सुरू झाल्या. काय चाललंय सध्या, वगरे. तेवढय़ात सात पस्तीस वाजले. दार बंद झालं. अंधार झाला. गप्पांना आळा बसला. आता कुणाला आत प्रवेश नव्हता. सगळ्यांचे फोन व्हायब्रेटर मोडवर गेले.
अंधारात सभ्य पांढरा सलवार- कुडता घातलेला माणूस (अतुल पेठे) मध्यात खुर्चीवर येऊन बसला. त्याची नजर समोर शून्यात. चेहरा निर्वकिार. श्रांत. स्टेजच्या दोन बाजूंपैकीच्या एका स्क्रीनवर त्या माणसाचा चेहऱ्यापासून गळ्यापर्यंतचा, तर दुसऱ्यावर चेहऱ्यापासून पायापर्यंतचा भाग दिसत होता. म्हणजे एकावर शीर, तर दुसऱ्यावर धड अशी मांडणी. नजर स्थिर. काही वेळ तसाच गेला. आता हा माणूस काही बोलेल किंवा काहीतरी घडेल असे वाटले. पण काहीच घडलं नाही.
बघे बघत होते. आणि अचानक त्या माणसाच्या नाकाच्या वरच्या भागातून रक्त येऊ लागले. ते वाढत गेले. नंतर एक लहान उबळ. तोंडातून रक्ताची धार येऊ लागली. अंधार झाला.
प्रकाश आल्यावर तेच दृश्य होते. पण रक्त वाढले होते. शुभ्र पांढरा कपडा रक्ताने लाल माखला जात होता. मग त्या माणसाच्या डोक्यावर रक्ताचे काही थेंब पडू लागले. पाहता पाहता मग रक्ताची संततधारच सुरू झाली. तो माणूस रक्तात भिजू लागला.
लोक कुतूहलानं बघत होते. एकदा या स्क्रीनवर शीर, तर दुसऱ्यावर धड.
परत एकदा अंधार होऊन प्रकाश आला. तरी तो माणूस तसाच बघत होता. शून्यात. निर्वकिार. कसलं दु:ख नाही. कसला अभिनिवेश नाही. त्यावर आता रक्ताचा अभिषेक होत होता. पांढऱ्याचा लाल तर तो कधीच झाला होता. त्याच्या पायाशी लाल रक्ताचं थारोळं जमा झालं होतं.
हे बघे बघत होते.
अंधार झाला. प्रकाश आल्यावर तो माणूस खुर्चीत नव्हता. पण तरी रक्ताचा अभिषेक होत होता. रक्त वाहत होतं. प्लास्टिक खुर्चीवर रक्ताच्या धारेचा काळजाला चिरून जाणारा आवाज होत होता. एका क्षणी तो आवाज थांबला.
बघ्यांनी तो ऐकला.
टय़ुबलाईट लागल्या. दार उघडलं. बघे बघत राहिले- खुर्चीकडे. काहीजण पांगले. काहीजण शहारले. काहीजण उठून गेले. मी सुन्न झालो. संपलं का? का आहे अजून काही? उठायचं का? का ते परत स्टेजवर येणारेत? ‘अरे वेडय़ा, कसे येतील आता ते? ते गेले. बेसिकली माइंडगेम होता रे. चल.’
गाडी काढली. मला कोणाशी बोलायचं नव्हतं. कोणाचं मत ऐकायचं नव्हतं. जे कानावर पडत होतं ते पण ऐकायचं नव्हतं. मनात एक लज्जा वाटत होती. आपण फक्त पाहत राहिलो. काही करू शकलो नाही. तो एक विषण्ण करणारा अनुभव होता.
‘सुदर्शन’मधून बाहेर पडून उजवीकडे चार पावलावर असणाऱ्या ‘साधना’च्या कार्यालयावरून पुढे वळलो. आठवलं.. आत्ता जो सुन्न करून टाकणारा अनुभव मी घेतला तसाच काहीसा.. किंबहुना, त्याहूनही अधिक गहिरा अनुभव आपण इथेच आजपासून दोन वर्षांपूर्वी एका माणसाच्या अंत्यदर्शनाच्या वेळेस घेतला होता.

– सिद्धेश पूरकर
siddesh.purkar@gmail.com