सध्या रिमेक गाण्यांचा ट्रेण्ड असून बऱ्याच जुन्या गाणी नव्या चालीसह नव्या आवाजात ऐकायला मिळतात. मात्र, हे रिमेक करताना बऱ्याचदा कॉपीराइट्सच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. काही दिवसांपूर्वी गायक अरमान मलिकचा ‘घर से निकलते ही’ हा अल्बम प्रदर्शित झाला. मात्र आता हा अल्बम वादाच्या भोवऱ्यात सापडला असून गीतकार जावेद अख्तर यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ‘पापा कहते है’ या चित्रपटातील हे मूळ गाणं प्रचंड गाजलं होतं. आजच्या काळातही या गाण्यासाठी असलेली क्रेझ पाहता अरमान आणि अमाल मलिक या गायक-संगीतकार बंधूंनी त्याचं रिक्रिएटेड व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा विचार केला. मात्र, मूळ गाण्याला शब्दबद्ध करणाऱ्या जावेद अख्तर यांचं नावदेखील श्रेयनामावलीत दिलं नाही. म्हणूनच टी सीरिस आणि मलिक बंधूंविरोधात अख्तर यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा : सावरकरांची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याला चाहत्याकडून अविस्मरणीय भेट

‘अशा प्रकारच्या घटना थांबल्या पाहिजेत. संबंधित व्यक्तींना मी कायदेशीर नोटीस बजावली आहे. माझ्या लोकप्रिय गाण्याचे बोल त्यांनी बदलले. ‘घर से निकलते ही’ या गाण्याच्या नव्या व्हर्जनच्या श्रेयनामावलीत ना संगीतकार राजेश रोशन यांचं नाव आहे, ना गायक उदित नारायण यांचं नाव आहे. एखाद्या चांगल्या कलाकृतीला पूर्णपणे नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे,’ अशा शब्दांत जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला.