लॉस एंजेलिस येथे ९०वा ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी (अमेरिकेतील वेळेप्रमाणे) पार पाडला आणि ‘द शेप ऑफ वॉटर’ या चित्रपटाचा दबदबा सोहळ्यात पाहायला मिळाला. सर्वाधिक १३ नामांकनं मिळालेल्या या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासह ४ पुरस्कार पटकावले. तर ‘कोको’ आणि ‘डंकर्क’ या चित्रपटांनीही प्रत्येकी २ पुरस्कारांवर आपले नाव कोरले. पण या ऑस्कर सोहळ्यातही एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय चित्रपटाचा विक्रम अबाधित राहिला. हा चित्रपट म्हणजे ‘टायटॅनिक’.

जगातील सर्वाधिक गाजलेली बोट दुर्घटना म्हणून टायटॅनिकच्या शोकांतिकेचा उल्लेख केला जातो. १९९७ साली याच घटनेवरून तयार करण्यात आलेल्या दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांचा ‘टायटॅनिक’ हा चित्रपट खूप गाजला. तिकीटबारीवर अनेक विक्रम करणाऱ्या या चित्रपटाने १९९७च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात तब्बल एक दोन नव्हे तर चौदा विविध विभागात नामांकनं मिळवली. त्यापैकी अकरा ऑस्कर पुरस्कारांवर कॅमेरुन आणि त्यांच्या टीमने आपले नाव कोरले. कोणत्याही चित्रपटाला ऑस्करमध्ये एकाच वेळी इतके घवघवीत यश मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. ‘टायटॅनिक’चा हाच विक्रम अजूनही कायम आहे. ‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर आतापर्यंत कोणत्याच चित्रपटाला एकाच वर्षात इतके ऑस्कर पुरस्कार मिळाले नाहीत.

वाचा : अखेर वनवास संपला! १४ वर्षानंतर त्यांनी पटकावला ऑस्कर

ऑस्कर पुरस्कारासाठी १४ नामांकनं ‘टायटॅनिक’सह ‘ऑल अबाऊट इव्ह’ आणि ‘ला ला लँड’ या चित्रपटांना मिळाली. पण या दोन्ही चित्रपटांना विविध विभागांमध्ये प्रत्येकी ६ ऑस्कर पुरस्कार मिळाले. ‘टायटॅनिक’नंतर ‘गोन विथ द वाइंड’ या चित्रपटाला १३ नामांकनं आणि ८ पुरस्कार तर ‘शेक्सपिअर इन लव्ह’ या चित्रपटाला १३ नामांकनं आणि ७ पुरस्कार मिळाले होते.

‘टायटॅनिक’ला २१ वर्षे लोटून गेली, परंतु आजही हा चित्रपट तितकाच लोकप्रिय आहे आणि आजही अनेक चाहते यातील हृदयस्पर्शी शेवटाबद्दल आपली नाराजी व्यक्त करतात.