गेल्या रविवारी झालेल्या ऑस्कर सोहळ्याची हवा निर्माण करण्यात देशी माध्यमे मागे राहिली?  की नामांकनामध्ये असलेल्या प्रायोगिक सिनेमांच्या अतिरेकामुळे माध्यमांपासून सामान्य चित्रप्रेमींची निराशा झाली? ऑस्करनंतर छायाचित्रीवृत्तांपलीकडे या पुरस्काराबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. यंदा पहिल्यांदाच व्यावसायिक चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेतून हद्दपार झाले होते. जगभरात बदलत्या दृश्यसंकल्पनांनी यंदाच्या ऑस्करबाबत कमी उत्साहाचे वातावरण तयार झाले, त्याची सविस्तर चर्चा करणारा लेख..
‘फिल्म इंडिपेण्डण्ट स्पिरिट अवॉर्ड’ नावाचा एक अमेरिकी पुरस्कार आहे. गेली तीन दशके ऑस्करच्या मखमली सोहळ्याच्या बरोब्बर आदल्या दिवशी नित्यनेमाने तो होतो. या पुरस्काराचे वैशिष्टय़ म्हणजे स्टुडिओच्या भरभक्कम मांडवाला टाळून तयार करण्यात आलेला प्रयोगक्षम चित्रपटच येथे मानकरी ठरतो. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या ऑस्करमध्ये यातील चित्रपट हमखास मागे असतात. पण येथे त्या चित्रपटाला ‘यथोचित’ शब्दाची व्याख्या तंतोतंत खरी ठरवणारा सन्मान मिळतो. त्याची अमेरिकेतर जगात प्रसिद्धी होत नसली, तरी सिनेप्रेमींपासून, सिनेअभ्यासकांमध्ये त्याचे महत्त्व फार आहे.  स्टीव्हन सोडरबर्गपासून, अल्टमन, क्वेन्टीन टेरेण्टीनोपर्यंत आणि कोएन ब्रदर्सपासून ते ख्रिस्तोफर नोलान, कोएन ब्रदर्स , डेव्हिड ओ. रसेलपर्यंत ‘वर्ल्ड फ्लॅट’ ent03  झाल्यानंतर नावारूपाला आलेल्या दिग्दर्शकांनी आपल्या उत्तम निर्मितींना त्या त्या वर्षांत ऑस्करमध्ये मागे तर या पुरस्कारावर आघाडी मिळविलेली आढळते.  मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये ऑस्कर आणि इंडिपेण्डण्ट पुरस्कारावर एकाच पुरस्कारांचे वर्चस्व हे आंतरराष्ट्रीय सिनेनिर्मिती, प्रेक्षकांच्या अभिरुचीची बदलती दिशा दर्शविणारे आहे. यंदा ‘बर्डमॅन’सारखा विशुद्ध कला, साहित्य आणि अभिनय यांच्या संदर्भदालनांनी खच्चून भरलेला चित्रपट इण्डिपेण्डण्ट आणि व्यवसायधार्जिण्या कलाउपासक ऑस्करवरही सारखेच यश प्रदान करताना दिसला. व्यावसायिक आणि प्रायोगिक चित्रपटांमधील धुसर होत चाललेल्या सीमारेषेची जाणीव त्यामुळे अधोरेखित झाली आहे. ही निव्वळ ऑस्करच्याच नाही, तर दृश्यमूल्यांमध्ये होत असलेल्या जागतिक बदलांची नांदी आहे.   
* ऑस्कर आणि खूपविके सिनेमे!
जगातील तिकीटबारीवर खच्चून गल्ला मिळविणारे सिनेमे आणि ऑस्कर यांचा दुरान्वयेही संबंध नसतो. (अर्थात टायटॅनिक आणि अवतार, स्टार वॉर्स लॉर्ड ऑफ द रिंग्जसारखे त्यातील अपवाद आहेत.) ‘हॅरी पॉटर’ ही सर्वाधिक कमाई केलेली चित्रमालिका, स्पायडरमॅनपासून सुपरहिरोंच्या कैक अवतारांचे अबालवृद्धांना आवडणारे चित्रपट कधीच ऑस्करच्या स्पर्धेत नसतात.  स्पेशल इफेक्ट्सचे ढीगभर वापर करणारे विज्ञानपट, तगडय़ा नायकांचे देमारपट आणि संगणकीय कौशल्याने दृश्यपातळीवर महाअनुभव देणारे चित्रपट यांच्या व्यवसायाच्या समीकरणांची वर्षभर हवा राहते. पण कलात्मक दर्जा, विषय-आशय यांच्यासोबत व्यावसायिकदृष्टय़ा घोडदौड, महोत्सवांमध्ये दर्शकांकडून मिळणारा प्रतिसाद आदी निकषांवर तावून-सुलाखून चित्रपट ऑस्करसाठी जानेवारीमध्ये जाहीर होणाऱ्या यादीमध्ये स्थान मिळवितात. त्यामुळे यादीतील एक ते दहापर्यंत कुठलाही सिनेमा हा दर्जेदार आणि एकमेकांना सारखीच टक्कर देण्याची क्षमता असणारा असतो. सर्वसाधारण प्रेक्षकांपासून सिनेवेडय़ांनी वर्षांत पाहिल्या गेलेल्या शेकडो उत्तम लोकप्रिय सिनेमांचा त्यात सहभाग नसतो. तरी यादीतील चित्रपटांच्या निवडीबाबत शंका घेता येणे शक्य नसते, इतके हे चित्रपट प्रेक्षकाच्या दृश्य आणि जीवनजाणिवांना विस्तारणारे असतात.  
* ऑस्करवर्षांची सिनेप्रेमी परंपरा!
सिनेमावेडय़ांच्या ऑस्करवर्षांची सुरुवात साधारणत: सप्टेंबर महिन्यापासून सुरू होते. आयएमडीबीपासून ते रोटन टोमॅटोसारख्या चित्रवृत्त पसरविण्यात आघाडीवर असलेल्या संकेतस्थळांमध्ये सिनेमा पाहणाऱ्यांच्या चर्चा झडतात. ब्लॉग्ज, सोशल नेटवर्किंग साइट्सवरूनही चित्रपटांच्या नावांचे मोठय़ा प्रमाणावर आदान-प्रदान घडते. गेल्या वर्षी या चर्चामध्ये पुढे आलेल्या नावांमध्ये ऑस्करमध्ये असलेली काही नावे पूर्णपणे अनुपस्थित होती. तर ‘गॉन गर्ल’, ‘नाइट क्रॉलर’, ‘अनब्रोकन’, ‘डॉन ऑफ दी प्लॅनेट ऑफ द एप्स’, ‘गार्डियन्स ऑफ गॅलॅक्सी’, ‘बिगिन अगेन’, ‘इन टू द वूड्स’, ‘केक’ यांची मोठी चर्चा होती. ऑस्कर गाजविणाऱ्या दादा दिग्दर्शकांच्या बिग आय, नोव्हा, द सर्च, एज ऑफ टुमॉरोव्ह, आदी चित्रपटांनाही पुरस्कार नाही मिळाला, तरी नामांकनामध्ये त्यांना स्थान मिळेल, अशी अटकळ लावली जात होती. या व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी चित्रपटांसोबत ‘आय ओरिजिन्स’ , फ्रॅन्क, फ्युरी हे चित्रपटही ऑस्करमध्ये असतील असा अंदाज घेतला जात होता. यादीतील कोणत्याही सिनेमाइतकाच दर्जा, विषय, आशय असलेल्या या चित्रपटांना मात्र चाहत्यांच्या मनामध्येच स्थान मिळाले. दरवर्षी याच प्रकारे जगातील कोणत्याही कोपऱ्यातील सिनेमाप्रेमींना सारख्याच प्रमाणावर आवडू शकतील अशा सर्वच चित्रपटांना ऑस्कर शर्यतीमध्ये शिरकाव करता येत नाही. चांगल्या चित्रअनुभवाच्या शोधात असलेल्या सिनेतक्षकांची ऑस्करगटातील सिनेमांसोबत एका ऑस्करवर्षांत तयार झालेल्या उत्तम सिनेमांना पाहण्याची परंपरा मात्र कायम राहते.
* थोडा ‘छोटा’ बदल!
तंत्रज्ञानाने खूप साऱ्या गोष्टी शक्य झाल्याने सिनेमा बदलला असला, तरी तंत्राची प्रगतीच सिनेमाच्या दृश्यपरिणामांना बदलत नाही. त्यात अनेक गोष्टी कारणीभूत असतात. बदलत्या ग्लोकल संदर्भाना आज खूपच महत्त्व आलेले आहे. अमेरिकी छोटा पडदा हा मोठय़ा पडद्याइतकाच त्या माध्यमाची ताकद संपूर्णपणे हाताळण्याचा प्रयत्न करीत आहे. मुख्य धारेतील प्रमुख कलावंत छोटय़ा पडद्याचा अधिक चांगला वापर करीत आहे (हाउस ऑफ कार्ड्स, ट्र डिटेक्टिव्ह्ससारख्या मालिका) तर छोटय़ा पडद्यावरून मोठय़ा पडद्याला व्यापणारे कलावंत तयार होत आहेत. (ब्रेकिंग बॅड या महामालिकेतून जगभरात लोकप्रिय झालेला ब्रायन क्रॅन्स्टन किंवा हाऊ आय मेट युवर मदर या मालिकेतून विनोद करीत यंदाच्या ऑस्कर सोहळ्याचा प्रमुख निवेदक बनलेला नील पॅट्रिक हॅरिस.) गॉथम, एपिसोड्स किंवा लॉस्ट, गर्ल्ससारख्या मालिकांमधील गोष्ट सांगण्यातील पद्धतीचा, मांडणीचा प्रभाव मोठय़ा पडद्यावरही मोठय़ा प्रमाणावर होत आहे.  या मालिका सिनेमाचाच महाअनुभव प्रेक्षकाला देत आहेत. वायुवेगाने सिनेमाकडून या मालिकांचा चाहतावर्ग वाढत आहे. त्याचाही परिणाम आता एकूण सिनेमा आकर्षण घटण्यात झाला आहे. अर्थात हा बदल छोटय़ा प्रमाणावर असला, तरी वेगाने पसरत आहे.
 ऑस्करमधील सिनेमा व्यावसायिक वा कलात्मक अशा कोणत्याही गटातील असला, तरी सिनेमाच्या या सर्वोच्च पुरस्काराचे कुतूहल चित्रपटप्रेमींमधून संपूर्णपणे ढळणार नाही. यंदाच्या अपवादात्मक वर्षांपुरती अनुत्साहाची मात्रा पुढल्या वर्षी असेलच, हे आत्ताच सांगता येणार नाही.

यंदाचे वेगळेपण!
ent02ऑस्करवर यंदा सर्वाधिक टीका झाली, ती त्याच्या नामांकनांमधून कृष्णवर्णीय चित्रपटांना हद्दपार करण्यात आल्याची. सेल्मा या कृष्णवंशीयांच्या इतिहासाचेच एक पान उलगडून दाखविणारा चित्रपट मुख्य धारेतील पुरस्कारांसाठी जाणूनबुजून डावलल्याची चर्चा झाली. गेल्याच वर्षीच्या १२ इयर्स ए स्लेव्ह चित्रपटाने ऑस्करवर इतिहास घडविला होता, अन् यंदा एकही कृष्णवंशीय सिनेमा ऑस्करमध्ये नाही त्यावरून शाब्दिक आणि लेखिक वादही मोठय़ा प्रमाणावर झडले. ऑस्करवर दुसरी टीका झाली ती त्यातल्या नामांकनांमध्ये निव्वळ प्रायोगिक सिनेमांच्या असण्यावरून. पीटर जॅक्सनच्या हॉबिट चित्रत्रयीतील अखेरचा सिनेमा, तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या हंगर गेम्स मालिका आणि फॉल्ट इन अवर स्टार्ससारख्या बुकब्लॉकबस्टर चित्रपटांना ऑस्करने खिजगणतीतही घेतले नाही. याउलट खूपच वैयक्तिक गोष्टी सांगणाऱ्या व्हिपलॅश, बर्डमॅन, द ग्रॅण्ड बुम्डापेस्ट हॉटेल, थिअरी ऑफ एव्हरीथिंग, इमिटेशन गेम्स या चित्रपटांना ऑस्करयादीत आघाडी मिळाली. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पठडीबाज चित्रपटांच्या फॉम्र्युलाला छेद देत कथेतील दुर्बळ व्यक्तिरेखेला प्रबळ बनविणाऱ्या सिनेमार्गाला टाळणारा ‘व्हिपलॅश’ किंवा अभिनेत्याच्या कलात्मक आणि वास्तव जीवनाच्या संदर्भाना सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवणारा बर्डमॅनसारखे सिनेमे प्रेक्षकाला व्यक्तिसापेक्ष अनुभव देऊ शकणारे आहेत. ते मानसिक उन्नयन करणाऱ्या सुखकारक सिनेमांसारखे नाहीत, तर बौद्धिक पातळीवर प्रेक्षकाला आव्हान देणारे आहेत. तब्बल बारा वर्षे एका सिनेमावर वैयक्तिक आयुष्य चित्रित करणाऱ्या रिचर्ड लिंकलेटरच्या बॉयहूड चित्रपटाचा संयतपणा आजच्या दृश्यवेगाशी एकरूप झालेल्या दर्शकांना न पचणारा आहे.  इमिटेशन गेम, सेल्मा किंवा थिअरी ऑफ एव्हरीथिंग या चरित्रपटांनीही मनोरंजनाच्या मूलभूत उद्दिष्टांपलीकडे याच मार्गावर गोष्ट घडविण्याचा मार्ग स्वीकारला आहे.  मोठय़ा प्रमाणावर प्रायोगिक सिनेमे ऑस्करवर येण्याची यंदाची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी अशी वैयक्तिक गोष्ट सांगणारा नेब्रास्का आणि फिलोमिना हे चित्रपट केवळ नावापुरते ऑस्करच्या यादीत होते. त्यांच्या वाटेला पुरस्कार आला नाही. यंदा सर्वच नामांकनामध्ये असलेल्या प्रायोगिक सिनेमांमुळे अमेरिकेतर देशांमध्ये त्यांच्या वितरण वकुबानुसार कमी-अधिक हवा तयार झाली. आपल्याकडची गल्लाभरू वितरणव्यवस्था आणि सेन्सॉर बोर्डाच्या अडथळ्यांमुळे हॉलीवूडचे भारतात प्रदर्शित होणारे दर्जेदार सिनेमे यांच्यात नेहमीच व्यस्त प्रमाण असते. गेल्या दशकभरातील पायरसी आणि त्यातून शहरी भागांत वाढलेला सिनेसाक्षर वर्ग यांमुळे केवळ थोडय़ाच प्रमाणावर ऑस्करचे चित्रपट पुरस्काराआधी निवडक ठिकाणी उपलब्ध होतात. यंदा भारतात ऑस्करची हवा तयार न होण्याचे महत्त्वाचे कारण  प्रायोगिक अस्तित्व असलेल्या चित्रपटांचीच ऑस्करमध्ये वर्णी लागणे हे आहे. सिनेवेडय़ांखेरीज सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी बर्डमॅन, द ग्रॅण्ड बुडापेस्ट हॉटेल चित्रपटांतील दृश्यिक आणि गोष्ट सांगण्याचे प्रयोग निव्वळ ‘बाउन्सर’ ठरू शकणारे आहेत.

लुपियाचा ‘तो’ महागडा गाऊन चोराने परत केला
ent04 ‘ट्वेल्व्ह इयर्स ऑफ सेल्व्ह’ या चित्रपटासाठी साहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर मिळवणाऱ्या लुपिया नियोंगोने गेल्या दोन वर्षांत ऑस्करच्या ‘रेड कार्पेट’वरती स्वत:च्या स्टाइल स्टेटमेंटमुळे फॅशन समीक्षकांची वाहवा मिळवली होती. यंदाही ‘कॅल्व्हीन क्लेअर’चा तब्बल ६००० सफेद मोत्यांचा वापर करून बनविण्यात आलेल्या गाऊनमध्ये तिने लक्ष वेधून घेतले
होते. तिचा हाच दीड लाख डॉलस्चा महागडा गाऊन
पुरस्काराच्या दुसऱ्या दिवशी चोरीला गेल्याचीही खूप चर्चा झाली. मात्र या चर्चेचा धुरळा खाली बसायच्या आत चोराने तो गाऊन परत केला आहे. गाऊनमधले मोती खोटे असल्याने त्याचा काहीही उपयोग नाही हे लक्षात आल्यावर हॉलीवूडचा खोटेपणा जगासमोर आणण्यासाठी गाऊन परत देण्याचा खटाटोप केला अशी विशेष कबुली चोराने माध्यमांसमोर दिली. यामुळे चोराने गाऊन परत दिल्याच्या चर्चेलाही आता उधाण आले आहे.

नक्षीकाम, फिकट रंगांची ‘रेड कार्पेट’वर मक्तेदारी
एरवी रेड कार्पेट म्हटलं की गडद रंगांच्या गाऊन्सची एक मालिकाच रेड कार्पेटवर पाहायला मिळते. पण यंदा रेड कार्पेटवर मक्तेदारी होती ती संपूर्णपणे फिकट रंगांची आणि भरीव नक्षीकामाने जडलेल्या गाऊन्सची. एमी स्टोन, लेडी गागा, जेनिफर लोपेझ, लुपिया नियोंगो, लॉरा देर्न, जेनिफर अ‍ॅनिस्टन अशा कित्येक ललनांनी रेड कार्पेटपर भरीव नक्षीकाम केलेले गाऊन मिरविले होते. नेहमीच्या मर्मेड स्टाइल किंवा लांबच लांब ट्रेल असलेल्या गाऊन्सऐवजी ए-लाइन आणि एम्पिरिअर स्टाइल गाऊन्सचा पगडा यावेळी पाहायला मिळाला. जेनिफर लोपेझ न्यूड रंगाच्या गाऊनमध्ये डिझ्नीची राजकुमारीच वाटत होती. तर लॉरा देर्नचा काळ्या रंगाचा एलिगंट गाऊनही भाव खाऊन जात होता.फिकट गुलाबी, फिकट हिरवा, पांढरा, बिस्किट रंग अशा फिकट रंगांचे गाऊन्स घालण्यास हॉलीवूड अभिनेत्रींनी यंदा पसंती दिली होती. मॅरिअ‍ॅन कोटिलार्डच्या पांढऱ्या रंगाच्या गाऊन्सपासून सुरुवात होऊन ही मालिका थेट ऑक्ॅटव्हीआ स्पेंसरच्या फिकट हिरव्या रंगाच्या गाऊनपर्यंत येऊन थांबली. यामध्ये झोए सल्दाना, केटी वॉशिंगटन, रीज विदरस्पून, ग्विनीथ पॅल्ट्रोसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्या गाऊन्सच्या निवडीबद्दल समीक्षकांची कौतुकाची थाप मिळवली. तर मॅरिअ‍ॅन कोटिलार्ड, लेडी गागाचा वेगळेपणाचा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही.
पंकज भोसले