कलाकारांचे व्यक्तिमत्त्व वस्त्रसौंदर्याद्वारे अधिक ठाशीव बनवत विभिन्न जातकुळीच्या सिनेमांना खास ‘पोशाखां’नी सजविणाऱ्या प्रख्यात वेशभूषाकार भानू अथय्या यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले.  त्या ९१ वर्षांच्या होत्या. हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी वेशभूषेचे स्वतंत्र विद्यापीठ घडविले. भारताला पहिला ऑस्कर त्यांनीच मिळवून दिला. त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेली आठ वर्ष भानू अथय्या मेंदूतील गाठीमुळे आजारी होत्या. गुरुवारी सकाळी त्यांचे देहावसान झाल्याची माहिती त्यांच्या कन्या राधिका गुप्ता यांनी दिली.

१९८२ साली रिचर्ड अ‍ॅटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याआधीपासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत झालेल्या कोल्हापूरच्या या कन्येने वेशभूषेचे नवे मापदंड निर्माण करीत फॅशनविश्वाला आपली दखल घ्यायला लावली होती.

कोल्हापूरमध्ये २८ एप्रिल १९२९ साली राजोपाध्ये कुटुंबात जन्मलेल्या भानुमती यांनी वडिलांकडून चित्रकलेचा वारसा घेतला. जे. जे. महाविद्यालयातून सुवर्ण पदकासह उत्तीर्ण झालेल्या भानू अथय्या यांनी फॅशन मासिकांसाठी रेखाचित्रे काढण्यास सुरुवात केली. अपघाताने त्यांचा चित्रसृष्टीत प्रवेश झाला. १९५१ पासून त्यांनी आपले आयुष्य वेशभूषेला समर्पित केले. ‘सीआयडी’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘वक्त’, ‘आरजू’, ‘आम्रपाली’, ‘गाइड’, ‘तिसरी मंझिल’, ‘मेरा साया’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘अभिनेत्री’, ‘रझिया सुल्तान’, ‘अग्निपथ’, ‘अजूबा’, ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ अशा शंभरहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी वेशभूषा केली होती. गेल्या दशकात त्यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या ‘लगान’ आणि ‘स्वदेस’ या चित्रपटांसाठी वेशभूषा केली. ‘स्वदेस’नंतर त्यांनी काम थांबवले.

शैलीनिर्मात्या..

अभिनेत्री नादिरा यांच्यासाठी ‘श्री-४२०’ या चित्रपटामधील ‘मुडमुडके ना देख’ या गाण्यासाठी त्यांनी स्वतंत्र शैलीचा गाऊन तयार केला. त्याची फॅशन नंतरच्या दशकभरातील सिनेमांत लोकप्रिय झाली. अभिनेत्री साधना यांच्या सलवार कमीझच्या त्यांनी आखून दिलेल्या शैलीचे पुढे अनुकरण झाले. गाइडमधील वहिदा रेहमान, ब्रह्मचारीमधील मुमताज आणि सत्यम् शिवम् सुंदरम्मधील झीनत अमान यांच्या वेशभूषा विशेष गाजल्या.