मराठी चित्रपटसृष्टी आता सातासमुद्रापार गेलीयं. ‘किल्ला’, ‘कोर्ट’, ‘सैराट’, ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांची सर्व स्तरातून प्रशंसा झाली. ‘सैराट’ने ८५ कोटींची कमाई करून एक मोठा रेकॉर्डच रचला. तत्पूर्वी, भारतीय न्यायव्यवस्थेवर भाष्य करणा-या ‘कोर्ट’ चित्रपटाचीही बरीच चर्चा केली गेली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आता चित्रपटाचा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ऑस्कर विजेता आणि ‘ग्रॅव्हिटी’, ‘हॅरी पॉटर’चे दिग्दर्शक अलफॉन्सो कुरॉन यांनी चैतन्यची शिष्य म्हणून निवड केली आहे.
टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कुरॉन यांनी चैतन्यची मुलाखत घेतली आणि त्यानंतर त्याची शिष्य म्हणून निवड करण्यात आली. पुढील एक वर्ष चैतन्य कुरॉन यांच्याकडून चित्रपट दिग्दर्शनाचे धडे घेणार आहे. कुरॉन यांच्याबद्दल बोलताना चैतन्य म्हणाला की, अर्थातचं आमचं सर्वाधिक संभाषण चित्रपटांबाबत झालं. तसेच, त्यांना ‘कोर्ट’ चित्रपट आवडल्याचेही त्यांनी सांगितले. याव्यतिरीक्त भारत आणि महाराष्ट्राबद्दलही त्यांनी माझ्याशी चर्चा केली. पुढचं एक वर्ष मी कुरॉन यांच्यासोबत काम करणार आहे. त्याचसोबत मी माझ्या पुढच्या चित्रपटाच्या कथेवरही काम करत असल्याचे चैतन्यने सांगितले.