यंदाचा ऑस्कर सोहळा खऱ्या अर्थाने सर्वाधिक चर्चेचा विषय ठरणार आहे. कारण एकिकडे या पुरस्कार सोहळ्यात चित्रपट कलेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव केला जात असतानाच दुसरीकडे याच कलाविश्वाची दुसरी बाजूसुद्धा सर्वांसमोर मांडण्यात येत आहे. निर्माता हार्वी विनस्टीनच्या असुरी वृत्तीचा संपूर्ण हॉलिवूडकडून विरोध केला जात असून, रेड कार्पेट पासून ते डॉल्बी थिएटरपर्यंत प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊचच्या विषयीसुद्धा सेलिब्रिटी आपल्या ठाम भूमिका मांडत आहेत. अभिनेत्री अॅश्ली जड आणि मिरा सोर्विनो यांनीसुद्धा ऑस्करच्या रेड कार्पेटवर हार्वी विरोधातील हा लढा असाच सुरु राहणार असल्याचं स्पष्ट केलं.

अॅश्ली आणि मिरा या दोघींनीही रेड कार्पेट इव्हेंटमध्ये एकत्र प्रवेश केला त्यावेळीसुद्धा त्यांनी हार्वीवर आपल्या शब्दांनी हल्ला बोल केल्याचं पाहायला मिळालं. हार्वी विरोधात आवाज उठवणाऱ्या काही अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव म्हणजे अॅश्ली जड. हार्वीने कशा प्रकारे आपलं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता याविषयी या दोन्ही अभिनेत्रींनी मोठ्या धाडसाने आपली बाजू मांडली होती. #MeToo आणि #TimesUp या दोन्ही महत्त्वाच्या चळवळींमध्ये या दोन्ही अभिनेत्रींचा सक्रीय सहभाग असून, त्यांच्यासोबत हॉलिवूडमधील इतरही काही अभिनेत्रींच्या नावांचा यात समावेश आहे.

वाचा : प्रिय आईस.. तू माझं सर्वस्व होतीस, जान्हवी कपूरने जागवल्या श्रीदेवींच्या आठवणी

#TimesUp या चळवळीविषयी सांगताना मिरा म्हणाली, ‘#TimesUp ही एक अशी चळवळ आहे, जी इतक्यात थांबणार नाहीये. सध्याच्या घडीला आम्ही आमच्या परीने कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षेची हमी मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत.’
मिराच्या वक्तव्याशी सहमत होत अॅश्लीनेही याविषयी तिचं मत मांडताना तो दुर्दैवी प्रसंग पुन्हा एकदा सर्वांसमोर आणला. ‘१९९७ ला हार्वी विनस्टीनने माझं शोषण केलं होतं. त्या दिवशी माझ्या वडिलांनी मला आधार दिला’, असं ती म्हणाली. बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर #MeToo आणि #TimesUp हे दोन्ही हॅशटॅग ट्रेंड फक्त हॉलिवूडच नव्हे तर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवण्यासाठी म्हणून #TimesUp सुरु करण्यात आला होता.