मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या कारखान्यात तयार झालेले चित्रपट गेल्या काही वर्षात अक्षरश: धुमाकूळ घालत आहेत. मार्व्हलने तयार केलेला जवळपास प्रत्येक सुपरहिरोपट कोट्यवधींची कमाई करताना दिसत आहे. २०१९ हे वर्ष मार्व्हलने विशेष गाजवले. त्यांच्या ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ या सुपरहिरोपटाने फक्त युरोप-अमेरिकेतच नव्हे तर भारतातही बक्कळ कमाई केली. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा सिनेइतिहासातील आजवरचा सर्वाधिक कमाई दुसरा चित्रपट ठरला. या चित्रपटाने जगभरातून तब्बल दोन हजार कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. परंतु या विक्रमी चित्रपटाला ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत मात्र स्थान मिळाले नाही.

शिवाजी महाराज्यांच्या काळातील मंदिरे – जुन्नर : भक्तिमार्गावरचं सौंदर्य…

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ या सुपरहिरोपटात तब्बल ३३ लोकप्रिय सुपरहिरो होते. विशेष म्हणजे यातील बहुतांश कलाकार हे जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांपैकी होते. त्यांनी या चित्रपटात केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती देखील करण्यात आली. मात्र यांपैकी कोणालाही ऑस्करच्या यादीत स्थान मिळवता आले नाही. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या रुसो बंधुंना एका विक्रमी सुपरहिरोपटाची निर्मिती करुन देखील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादीत स्थान मिळाले नाही. शिवाय आश्चर्याची बाब म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्ले, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट पोशाख, बेस्ट फिल्म एडिटिंग, बेस्ट साउंड एडिटिंग यांपैकी मानाच्या समजल्या जाणाऱ्या कुठल्याही विभागात या चित्रपटाला नामांकन मिळाले नाही. तसेच वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार पुरस्कारासाठी नामांकने जाहिर करणाऱ्या समितीने या चित्रपटाचा फारसा विचार देखील केला नाही.

Video: सुपरवुमन उर्वशी रौतेला! उचललं १०० किलो वजन

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ला केवळ व्हिज्युअल इफेक्ट्स या एकाच विभागात नामांकन मिळाले आहे. परंतु या विभागात त्यांना ‘द लायन किंग’, ‘स्टार वॉर्स’, ‘१९१७’, आणि ‘द आयरिशमॅन’ यांसारख्या तगड्या चित्रपटांचे आव्हान आहे. ‘द लायन किंग’ या चित्रपटाने तर लाईव्ह अ‍ॅक्शनसारखा अनोखा प्रयोग अ‍ॅनिमेशनच्या जगात जणू क्रांतीच केली असे समिक्षकांनी म्हटले होते. त्यामुळे या विभागात अ‍ॅव्हेंजर्सला पुरस्कार मिळणे फारच कठीण समजले जात आहे.