रेश्मा राईकवार

सर्जनशील अभिव्यक्तीला माध्यमाचं कुठलंही बंधन नसतं. त्यातूनही आपल्याकडच्या गोष्टी सांगायच्या असतील तर माध्यम चित्रपटाचं असो वा वेबमालिके चं.. गोष्ट दोन्हीकडे रंगवून सांगता येते. त्यामुळे मूळ उद्देशात फारसा फरक पडत नाही. उलट ओटीटीच्या माध्यमातून सध्या जो गोष्टी सांगण्याचा सूर लागला आहे तो उत्तम आहे, अशी पोचपावती देणारे दोन तरुण चित्रपटकर्मी सध्या त्यांच्या ‘बंदिश बँडिट’ या नव्या वेबमालिके मुळे चर्चेत आहेत. शास्त्रीय संगीत आणि आधुनिक संगीतातलं पिढय़ानपिढय़ांचं द्वंद्व सुरेल आणि सुरेख पद्धतीने रंगवणाऱ्या या वेबमालिके चा निर्माता आहे अमृतपाल सिंग बिंद्रा आणि दिग्दर्शक आहे आनंद तिवारी. या दोघांनी या मालिकेच्या निर्मितीसह लेखनाचीही जबाबदारी सांभाळली आहे.

आनंद तिवारी हे नाव आणि चेहरा चित्रपटप्रेमींसाठी नवीन नाही. त्याने आत्तापर्यंत अनेक चित्रपट-जाहिराती आणि मालिकांमधून काम केले आहे. रंगभूमीवरून अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या आनंदने सुरुवातीपासूनच लेखन, दिग्दर्शन अशी चित्रपटनिर्मितीची वेगवेगळी अंगं अभ्यासत कार्यरत राहिला आहे. ‘खेळ आणि कला या दोन्ही गोष्टींकडे मी एका समान दृष्टिकोनातून पाहतो. मला लहानपणापासून खेळायला आवडतं. त्यातही क्रिकेट म्हटलं की तुम्हाला गोलंदाजीही आली पाहिजे, फलंदाजीही आली पाहिजे. तसंच कलेच्या क्षेत्रातही मला अभिनयही करायला आवडतो, लेखन-दिग्दर्शनही करायला आवडतं. त्या क्षणाला जे मला सगळ्यात जास्त उत्साहित करतं त्यात मी रमतो’, असं तो सांगतो. आनंद आणि अमृतपाल या दोघांनी एकत्र निर्मितीसंस्थेची सुरुवात केली. अमृतपालने लॉस एंजेलिसमध्ये ‘ट्वेन्टिथ सेन्च्युरी फॉक्स’सारख्या स्टुडिओत काम केलं आहे. चित्रपट आणि वेबमालिका या दोन्हींसाठी लागणारी मेहनत, लेखन-दिग्दर्शन-अभिनयासह लागणारी सर्जनशील प्रक्रिया सारखीच असते. हाताळणीचा फरक असू शकतो, पण मोठा फरक आहे तो म्हणजे चित्रपटांपेक्षा वेबमालिकांमध्ये जास्तीत जास्त व्यक्तिरेखांशी खेळता येतं, असं अमृतपाल सांगतो. चित्रपटातही नायक-नायिका, त्यांच्या बाजून येणारे त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, एखाददुसरा खलनायक अशा व्यक्तिरेखा वाढत जातात, मात्र कितीही व्यक्तिरेखा आल्या तरी गोष्ट त्या दोघांची किंवा फारतर तिघांची असू शकते. वेबमालिकांमध्येही मुख्य व्यक्तिरेखा त्याच पद्धतीने येतात, पण इथे त्यांच्याबरोबर येणाऱ्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांची स्वतंत्र गोष्ट रंगवायला वाव मिळतो. त्या व्यक्तिरेखांची गोष्ट आली म्हणून मूळ व्यक्तिरेखा मागे पडत नाहीत. उलट या गोष्टी एकमेकांमध्ये गुंफत ती रंगवत नेता येते. हे स्वातंत्र्य आणि लेखक-दिग्दर्शक म्हणून व्यक्तिरेखांशी खेळता येणं या दोन गोष्टींचं सर्जनशील समाधान वेबमालिकांमध्ये मिळतं, असं अमृतपाल म्हणतो.

गेल्या काही वर्षांत डिजिटल माध्यमांचा व्याप वाढतच गेला. आम्ही कंपनी सुरू केली तेव्हा आम्हाला फक्त आमच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या. डिजिटल माध्यमाची नुकतीच सुरुवात झाली होती आणि आम्ही त्या माध्यमात शिरकाव केला. २०१५ मध्ये आम्ही ‘बॅण्ड बाजा बरात’ ही वेबमालिका केली आणि तेव्हापासून डिजिटल माध्यम जसं मोठं होत गेलं तशी आमची कंपनीही मोठी होत गेली, असं आनंद सांगतो. या दोघांनी ‘नेटफ्लिक्स’साठी ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ हा भारतातील पहिला वेबचित्रपट केला. माझ्या मते आपल्यासमोर जे माध्यम उपलब्ध आहे त्या माध्यमातून आपल्याला गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. आमची पिढी ही चित्रपटांवर वाढलेली आहे. आमच्या आधीची पिढी ही पथनाटय़ांपासून रंगमंचीय नाटके पाहात मोठी झाली. त्या त्या वेळी आम्ही ते माध्यम अनुभवले आहे, पण डिजिटल माध्यम हे जर सध्या जगाचे माध्यम बनले असेल तर आम्ही त्या माध्यमाचा वापर करायलाच हवा. उद्या जर ‘व्हीआर’ (व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी)सारखे माध्यम आले तर त्यावरही आम्ही काम करू, असं आनंद विश्वासाने सांगतो.

‘बंदिश बँडिट’ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल ते दोघेही भरभरून बोलतात. असा विषय चित्रपटातून हाताळला असता तर कदाचित अनेक वाद-प्रश्न उभे राहिले असते. वेबमालिके मध्ये आशय कितीही कठीण असला तरी तो वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचं स्वातंत्र्य मिळतं. या स्वातंत्र्यामुळेच ‘बंदिश बँडिट’चा आशय अधिक खुलेपणाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असावा, असं अमृतपाल म्हणतो. गप्पांमधूनच सुचलेला हा विषय अभ्यासातून अधिक खुलत गेला, असं तो सांगतो. ‘आमच्या मित्राचे वडील खूप मोठे शास्त्रीय गायक आहेत. त्यांच्याशी बोलत असताना ते सहज म्हणाले, गेली १९ वर्ष मी एका रागावर काम करतो आहे. आता कुठे तो मला समजू लागला आहे असं वाटतं आहे. त्यांचा हा विचार आम्हाला अचंबित करून गेला. एका रात्रीत यश मिळावं म्हणून धडपडणारी सगळी माणसं आजूबाजूला असताना एके का रागावर मेहनत घेणारी ही माणसंच वेगळी आहेत, हे लक्षात आलं. त्यानंतर जाणीवपूर्वक शास्त्रीय संगीतातील दिग्गजांशी बोलत गेलो. प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन-एहसान-लॉय यांनीही यासाठी मदत केली आणि हळूहळू या चित्रपटाची कथा आकारत गेली’, असं अमृतपाल सांगतो.

‘बंदिश बँडिट’ हे सुरुवातीला आम्ही तात्पुरतं दिलेलं नाव होतं, पण ते या विषयाबद्दल तितकंच अर्थपूर्ण भाष्य करणारं होतं. उर्दू भाषेत चीज बांधणं म्हणजे बंदिश. आणि बँडिट म्हणजे कु ठलीही बंदिशे किंवा बंधनं तोडून नवं काही करण्याची ऊर्जा बाळगणारे या दोन्ही अर्थाने हे शीर्षक चपखल बसलं, असं आनंद सांगतो. या वेबमालिके च्या कथेबरोबरच त्यातील कलाकारांची निवडही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यातील मुख्य व्यक्तिरेखेसाठी अभिनेता नसिरुद्दीन शहा यांच्याशिवाय दुसरा कोणताच कलाकार आमच्या डोळ्यासमोर नव्हता. त्यांच्यासमोर तितक्याच ताकदीने उभी राहील अशी व्यक्तिरेखा अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी साकारली आहे. मी गेली दहा वर्ष अतुल कुलकर्णी यांना ओळखतो आहे. त्यांची पत्नी गीतांजली यांच्याबरोबर मी नाटकही केलं आहे. त्यांच्यासारखा उत्तम कलाकार नाही. ते या भूमिके साठी होकार देतील की नाही अशी शंका होती, पण त्यांना कथा आवडली आणि त्यांनी होकार दिला’, असं आनंदने सांगितलं.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांबरोबर आनंदने काम केलं आहे, मात्र या दिग्गज कलाकारांना दिग्दर्शक म्हणून हाताळण्याचा अनुभवही तितकाच अनोखा असतो, असं तो म्हणतो. मुळात कलाकारांकडून दिग्दर्शक म्हणून काम करून घ्यायचं असेल तर त्यांना माणसासारखं समजून घेतलं पाहिजे. या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करताना त्यांच्याशी माझं एक नातं असतं. मुळात एका कलाकाराची मानसिकता काय असते याची मला चांगलीच जाण आहे, त्याचा फायदा मी करून घेतो. समोरच्या कलाकाराला समजून घेत त्याच्या कलाने काम करणं मला छान जमतं’, असं तो सांगतो.  टाळेबंदीमुळे चित्रपटसृष्टीचे सगळेच व्यवहार बंद पडले, अशावेळी लेखकांनी सतत नवं काही लिहित राहणं महत्त्वाचं आहे असं सांगणारा आनंद आणि या काळात ओटीटीसारखं माध्यम हे सर्जनशील कलाकारांना सापडलेला नवा सूर आहे, असं मानणारा अमृतपाल दोघंही येत्या काळात आणखी काही आशयपूर्ण वेबमालिका आणि चित्रपट घेऊन येणार असल्याची ग्वाही देतात.