‘प्यार का पंचनामा’, ‘बदनाम गली’, ‘मिर्झापुर’ यांसारख्या वेब मालिका आणि चित्रपटात अभिनेता दिव्येंदू शर्मा आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडून जातो. विशेषत: ‘प्यार का पंचनामा’मधील त्याची भूमिका विशेष गाजली. हाच गुणी कलाकार आता ‘झी ५’वरील ‘शुक्राणू’ या वेब मालिकेतून दिसणार आहे. ‘शुक्राणू’ हा वेब चित्रपट असून यात समाजातील वास्तवावर विनोदी अंगाने भाष्य करण्यात येते. सत्तरच्या दशकात भारतात पुरुषांची नसबंदी करण्यात आली होती. या घटनेमुळे नसबंदी झालेल्या पुरुषांच्या पत्नींनी आत्महत्या केली होती. ‘शुक्राणू’ या चित्रपटाची कथा याच घटनेभोवती फिरते. या चित्रपटात अभिनेत्री शीतल ठाकूर आणि श्वेता बासू शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते बिष्णू देव हलदार यांनी केले आहे. या चित्रपटात नायकाची भूमिका साकारण्यासाठी दिव्येन्दूने सत्तरच्या दशकातील सुपरस्टार मनोज कुमार, अमिताभ बच्चन आणि धर्मेन्द्र यांचे चित्रपट पाहिल्याचे सांगितले.

या बेव मालिका अथवा चित्रपटांची तो जाणीवपूर्वक निवड करतो. याबद्दल सांगताना, ‘मी चित्रपट अथवा मालिकेची निवड करताना कथेला प्रथम प्राधान्य देतो. ‘शुक्राण’चित्रपटाची कथा ऐकल्यावर मला यात नावीन्य वाटले. यासारख्या सामाजिक विषयावर चित्रपट मालिका तुलनेने कमी बनले आहेत. या विषयांवरच्या चित्रपट वेब मालिकांमुळे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास पुन्हा जिवंत होईल,’ असेही मत तो व्यक्त करतो.   प्रत्येक कलाकाराचे एक स्वप्न असते. माझ्या आयुष्यात मला सत्तरच्या दशकातील हिरोची भूमिका करायची होती, ती ‘शुक्राणू’च्या निमिताने पूर्ण झाल्याचे दिव्येंदूने सांगितले. या चित्रपटात सहकलाकार शीतल आणि श्वेता यांच्यासोबत काम करण्यास मजा आली होती. आम्हा तिघांची अप्रतिम केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नवीन वेगळी मांडणी असलेली वेब मालिका पाहण्यास मिळेल, असेही मत त्याने व्यक्त केले.  ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन आशय आणि कथानकाच्या वेब मालिका आणि चित्रपट येत आहेत. याआधी दिव्येंदूने ‘बदनाम गली’ या वेब मालिकेत पत्रलेखासोबत काम केले आहे. ‘बदनाम गली’मध्ये गरोदर असलेल्या एकटय़ा महिलेचा संघर्ष मांडण्यात आला होता.