करोनाच्या वाढत्या साथीमुळे शहरा-शहरात अजूनही खबरदारी घेतली जाते आहे. लॉकडाउनच्या कडक नियमांमुळे आणि खबरदारीमुळे सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर आणि एकत्र जमण्यावर अजूनही मर्यादा आहेत. या साऱ्यात मालिकांची चित्रीकरणे जरी सुरु झालेली असली तरी शासनाने त्यांनाही सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण करण्यास परवानगी दिलेली नाही. अशावेळी मालिकांमधे सतत घरातलेच प्रसंग दिसण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांना दृश्यस्वरुपात वेगळेपण मिळणे अवघड झालेले आहे. पण झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेने ह्यावर एक तोडगा शोधला आहे.

सई आणि आदित्यची प्रेमकथा रंगत असताना, दोघांनी एकमेकांना भेटण्यासाठी शहराजवळच्या एका टेकडीवरची जागा निवडली आणि तिथून रात्रीच्या वेळी शहराच्या चमचमणा-या दिव्यांचा अनुभव घेतला. एकमेकांचा सहवास अनुभवला. ह्या प्रसंगासाठी लॉकडाउनच्या काळात बाहेर जाऊन चित्रीकरण करणे शक्य नव्हते. पण प्रेक्षकांना हा अनोखा अनुभव देण्यासाठी ‘माझा होशील ना’च्या टिमने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे आणि रात्रीच्या वेळच्या शहराजवळच्या टेकडीचा अनुभव सादर केला आहे.

शनिवार दिनांक १८ जुलै रोजी हा भाग रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. घरबसल्या निसर्गाच्या सानिध्यात टेकडीवरुन शहर पाहण्याचा आणि सई-आदित्यची रंगत जाणारी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.