एखाद्या चित्रपट पाहण्याचा पुरेपूर आनंद लुटायचा असेल तर मल्टिप्लेक्सशिवाय प्रेक्षकांना पर्याय नसतो. अनेकदा प्रेक्षक तिकीटाचे दर चढे असूनही पदरमोड करून केवळ चांगल्या अनुभवासाठी मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायलाही जातात. मात्र, याठिकाणी साधे पाणी किंवा खाद्यपदार्थ विकत घ्यायचे झाल्यास त्याच्या किंमती पाहून सामान्य प्रेक्षकांचे डोळेच विस्फारतात. कर आणि इतर सर्व आकडेवारी लक्षात घेता येथे विकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांवर दुप्पट रक्कम आकारली जाते. हा भुर्दंड टाळण्यासाठी प्रेक्षकांनी घरूनच येताना खाद्यपदार्थ आणले तरीही मल्टिप्लेक्सच्या प्रशासनाकडून मज्जाव केला जातो.

प्रत्यक्ष चित्रपटगृहात प्रेक्षकांना स्वत:ची पाण्याची बाटलीही आतमध्ये नेऊन दिली जात नाही. मात्र, प्रेक्षकांना अशाप्रकारे खाद्यपदार्थ थिएटरमध्ये नेण्यास बंदी असलेला कोणताही कायदाच अस्तित्त्वात नसल्याची बाब समोर आली आहे. चित्रपटगृहात खाद्यपदार्थ नेण्यावर निर्बंध लावणे कायद्याने गैर असल्याचे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले. ग्राहकांना त्यांचे मुलभूत हक्क मिळालेच पाहिजेत, असे मत त्यांनी ठामपणे मांडले.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करताना प्रेक्षकांकडे असणाऱ्या पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची सुरक्षा रक्षकांकडून तपासणी केल्यानंतर त्या गोष्टी आतमध्ये नेण्यात काहीच अडचण नसते. पण, तरीही तशी परवानगी न दिल्यास ग्राहकांनी संबंधितांना याविषयी विचारणा करावी, असे देशपांडे यांनी सांगितले. यासंबंधी राज्यातील सर्व चित्रपटगृहांना लवकरच नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची होणारी लूट थांबणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.