पुढील पाच वर्षांत ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) कंपन्या एकत्रितपणे राज्य करताना दिसतील, असा विश्वास माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. २०१८ या वर्षांत डिजिटल स्पेसवर ‘ओटीटी’ कंपन्यांनी प्रभावी स्थान मिळवले. याला कारण दूरचित्रवाणीच्या आशयाला कंटाळलेला प्रेक्षकवर्ग ‘ओटीटी’कडे गेल्याचे मानले जात होते; परंतु तसे नसून ही दोन्ही माध्यमे समांतरपणे येत्या काळातील आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज झाली आहेत..  ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) कंपन्यांमध्येही आपापसातील स्पर्धा वाढली आहे. एका खासगी कंपनीच्या अहवालानुसार फेब्रुवारी महिन्यात अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने पहिल्या क्रमांकावर बाजी मारली असून नेटफ्लिक्स दुसऱ्या आणि हॉटस्टार तिसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारीपासून ‘ओटीटी’ची वाढलेली प्रेक्षकसंख्या ही भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नव्या नियमामुळेही वाढलेली दिसून येते. एरव्ही टीव्हीवर मालिका पाहणारी अनेक मंडळी सध्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मालिका पाहतायेत. त्यामुळे ‘ओटीटी’ प्लॅटफॉम्र्सवरची प्रेक्षकगर्दी अचानक वाढली आहे, अर्थात टीव्हीच्या आशयाला कंटाळलेली मंडळी इथे प्रामुख्याने आहेत हे नाकारून चालणार नाही.

देशभरात दिल्ली, कोलकाता, मुंबई, पुणे, बंगलोर, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद या प्रगत शहरांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम पाहणाऱ्यांची संख्या ७० टक्के आहे, तर नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार पाहणाऱ्यांची संख्या अनुक्रमे ५६ टक्के आणि ५० टक्के आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम प्रेक्षकप्रिय होत असल्याचं पहिलं कारण म्हणजे अ‍ॅमेझॉनचे मासिक शुल्क नेटफ्लिक्सपेक्षा कमी आहे. अ‍ॅमेझॉन ग्राहकांकडून १२९ रुपयांच्या आसपास मासिक शुल्क घेत असून नेटफ्लिक्सचे मासिक शुल्क ५०० ते ८०० रुपयांच्या आसपास आहे, तर हॉटस्टार १९९ च्या आसपास प्रीमियम सेवा देत आहे.

या दोन्ही ‘ओटीटीं’चा प्रेक्षकवर्ग बऱ्यापैकी निश्चित झाला असून इतर ‘ओटीटी’ समोर आपला हक्काचा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्याचे आव्हान आहे. हॉटस्टारला खेळ पाहणारा प्रेक्षकवर्ग जास्तीत जास्त आहे. २३ मार्चपासून सुरू होणाऱ्या ‘आयपीएल’चे सर्व हक्क स्टार इंडियाकडे असून हॉटस्टार हा एकमेव अधिकृत डिजिटल प्रक्षेपण दाखवणारा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे खेळाची हीच ओळख त्याला स्पर्धेत टिकवून ठेवेल. गेल्या महिन्याभरातील प्रेक्षकसंख्येचा विचार करता वूटला २८ टक्के, इरॉस नाऊ ला १७ टक्के, अल्ट बालाजीला १३ टक्के, टीव्हीएफ प्लेला ६ टक्के आणि इतर ओटीटीना मिळून ३ टक्के एवढी प्रेक्षकसंख्या मिळाली होती.

येत्या काळात दूरचित्रवाणी आणि ‘ओटीटी’ला एकमेकांपासून स्पर्धेचा धोका नसून ते एकत्रितरीत्या टिकून राहतील असा निष्कर्ष फिक्की फ्रेम्स २०१९ च्या परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केला. ही दोन्ही माध्यमे हातात हात घालून वाटचाल करतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या वर्षी सगळ्यात मोठी गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे ट्रायचा वाहिन्यानिवडीचे हक्क देणारा नियम. या नियमामुळे वाहिन्यांच्या किमती एकसमान झाल्या तरी वाहिन्यानिवडीच्या स्वातंत्र्याने एकच गडबड उडाली आहे. त्यामुळे एका बाजूला प्रेक्षक दूरचित्रवाणीकडून जास्तीत जास्त प्रभावी आशयाची आस धरून बसला आहे, तसाच तो दुसरीकडे ‘ओटीटी’चे पर्यायही अजमावून पाहतो आहे. या अजमावून पाहणाऱ्यातील निम्या प्रेक्षकांनी ‘ओटीटी’लाच मनोरंजनाचा एकमेव पर्याय म्हणून पाहायला सुरुवातही केली आहे.

दूरचित्रवाणीच्या नियमनानंतर आता ट्रायने आपला मोर्चा ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मच्या नियमनाकडे वळवला आहे. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रात होणाऱ्या बदलांकडेही लोकांचे लक्ष लागले आहे, कारण टेलिकॉम कंपन्यांबरोबर भागीदारी करून ‘ओटीटी’ प्लटफॉर्म आपली प्रेक्षकसंख्या वाढवण्याच्या विचारात असल्यामुळे या बदलांचा परिणाम त्यांना सोसावा लागणार आहे. एका खासगी कंपनीच्या अहवालात असेही दिसून आले की, मोबाइलवर नेटपॅक वापरणाऱ्या ६० टक्के नोकरदार वर्गाची पसंती ओटीटी प्लॅटफॉर्मला मिळत असून उर्वरित २० टक्के वर्ग हा टेलिव्हिजनशीच जोडलेला आहे; परंतु भारतात आपली मुळं घट्ट रोवण्यासाठी भारतीय प्रेक्षकांची मानसिकता ओळखणेही गरजेचे आहे हेही ओटीटींनी ओळखले आहे. भारतीयांच्या मानसिकतेचा अभ्यासच त्यांना प्रादेशिक भाषेतील आशय, संस्कृतीशी निगडित गोष्टींकडे घेऊन आला आहे. टेलिव्हिजन हे केबलचालक आणि डीटीएच चालकांच्या मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आणि ओटीटी इंटरनेटमुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे या दोन्ही माध्यमांच्या प्रक्षेपणासाठीच्या अवलंबित्वामुळे ते पुढील १० वर्षे समांतर रेषेवर टिकून राहतील.

‘फिक्की’च्या या वर्षीच्या अहवालानुसार ‘ओटीटी’वर इंग्रजी भाषेतील आशय पाहणारी प्रेक्षकसंख्या फक्त ७ टक्के आहे; परंतु हिंदी आशय पाहणारी प्रेक्षकसंख्या ६३ टक्के आहे आणि इतर प्रादेशिक भाषांतील प्रेक्षकसंख्या ३० टक्के आहे. त्यामुळे भारतीय भाषांमध्ये आशयाची निर्मिती करण्यावर भर दिल्यास भविष्य उज्ज्वल आहे, ही सद्य:स्थिती आहे. त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबातील गृहिणी जेव्हा ओटीटीवर येईल तेच ओटीटीचे यश असेल. असाही मापदंड या ओटीटी कंपन्यांमध्ये वाढत चाललेल्या स्पर्धेतून पसरला आहे. त्यामुळे हाती आलेले हे मनोरंजनाचे प्रभावी माध्यम भारतीय प्रादेशिक भाषांमधील आशयनिर्मितीमुळे आणि टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्क प्लॅनच्या सोबतीने येत्या काळात कसे बहरते, याची उत्सुकता आहे.

  • ‘ओटीटी’ची वाहिन्यांकडे प्रेक्षकसंख्येसाठी हातमिळवणी आणि टेलिकॉम कंपन्यांशी भागीदारी हा मुद्दाही या संदर्भात विचारात घेण्यासारखा आहे. ‘अल्ट बालाजी’ सुरू झाल्यापासून एकता कपूरने ज्या मालिकांची निर्मिती दूरचित्रवाहिनीसाठी केली होती, त्या मालिका तिने आपल्या ‘अल्ट बालाजी’ या ‘ओटीटी’वर दाखवायला सुरुवात केली. वूटवर ‘कैसी ये यारिया’ मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे सगळे भाग दाखवून झाल्यावर ते आता ‘एमटीव्ही’वर दाखवले जात आहेत. त्याच पद्धतीने भविष्यात अ‍ॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स यांच्याकडूनही त्यांचा आशय दूरचित्रवाणीवर प्रक्षेपित केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • वूट, हॉटस्टार, जी ५, सोनी लाइव्ह या वाहिन्यांच्या ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मची स्वतंत्र वेबसीरिज निर्मिती अजून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली नाहीय. त्यामुळे यांनी आधी आपापल्या वाहिन्यांवरील मालिकांचे भाग ‘ओटीटी’वर विनाअडथळा दाखवत प्रेक्षककांना आकर्षित करणे गरजेचे आहे. तसे न करता स्वतंत्र वेबसीरिज निर्मिती केली तर त्यांना फटका बसू शकतो. ‘अल्ट बालाजी’ या ओटीटीवर एकताने निर्मिती केलेले चित्रपट व मालिका पाहता येत असून त्यांच्या स्वतंत्र वेबसीरिजही प्रेक्षकांना आवडत आहेत.
  • आधी प्रेक्षक सवयीने मालिका ज्या वेळी प्रसारित होते, त्याच वेळेत ती पाहायचे. आता याचे प्रमाण सुमारे ७५ टक्क्यांनी कमी झाले असून मालिकांचे पुन:प्रसारित भाग किंवा पाहायचे राहिलेले भाग ‘ओटीटी’वर जाऊन पाहणारा प्रेक्षकवर्ग वाढला आहे. त्याने सहजपणे ‘ओटीटी’वरील मनोरंजनालाच झुकते माप देणे सुरू केले आहे. आपल्या मनोरंजनासाठी हक्काने दूरचित्रवाणी पाहणारा आणि चित्रपटगृहात जाऊन समरसून चित्रपट पाहणारा प्रेक्षक आता ‘ओटीटी’ आणि दूरचित्रवाणीसाठी ग्राहक न राहता सबस्क्रायबर (सदस्य) बनला आहे. त्यामुळे त्याला आवडेल तेच आणि परवडेल तेच पाहण्याला तो पसंती देणार आहे. आधीसारखा वाहिन्यांवर जे दाखवले जातेय ते पाहण्यात समाधान मानणारा ग्राहक तो राहिला नाही.
  • दूरचित्रवाणी आणि ‘ओटीटी’ या दोन्ही माध्यमांना भारतीय बाजारपेठेत समान संधी मिळण्यासाठी दूरचित्रवाणीनंतर ‘ओटीटी’साठीच्या नियमनासाठी ट्रायकडून आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या डिसेंबरपासूनच सर्व स्तरांतील प्रेक्षकांच्या सूचनांवर विचारविनिमय सध्या सुरू आहे. मनोरंजन क्षेत्रातील लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि निर्माते यांच्यासाठी कथा सांगण्याचं अजून एक प्रभावी माध्यम म्हणून ‘ओटीटी’कडे पाहिलं जातंय. त्यामुळे चित्रपटनिर्मितीप्रमाणेच ते वेबसीरिजकडेही गांभीर्याने पाहत आहेत. भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये सामावलेला आशय प्रेक्षकांना अधिक आकर्षित करू शकतो. हे कळल्यावर ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म विविध भाषांना प्राधान्य देत त्या भाषांमधील साहित्य, प्रभावी, प्रेरणादायी व्यक्तींची चरित्रे यांच्यावर वेबसीरिजमधून भर देताना दिसत आहेत.