सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (CAA) सध्या देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी या कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात खूप मोठे वाद देखील झाले आहेत. समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींसह सेलिब्रेटींची देखील याबाबत विविध मतं आहेत. अलिकडेच सुपरस्टार रजनीकांत यांनी CAA मुस्लीम विरोधी नाही असं म्हणत सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थन केले होते. यावरुनच आता माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते  पी चिदंबरम  यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम  यांनी रजनीकांत यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले कार्ती चिदंबरम?

“रजनीकांत भाजपाचे पोपट आहेत. आपल्या मालकानं दिलेली पटकथा ते वाचत आहेत.” अशा आशयाचे ट्विट करुन त्यांनी रजनीकांत यांच्यावर टीका केली आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रजनीकांत यांच्या चाहत्यांनी या ट्विटवर जोरदार टीका केली. तर CAAच्या विरोधकांनी कार्ती  चिदंबरम यांच्या वक्तव्यावर आपलं समर्थन दर्शवलं.

काय म्हणाले होते रजनीकांत?

“सुधारित नागरिकत्व कायद्याचा आपल्या देशातील कोणत्याही नागरिकांवर परिणाम होणार नाही. जर हा मुस्लीमांवर परिणाम करणार असेल तर मी पहिला व्यक्ती असेल जो त्यांच्यासाठी उभा राहील. देशाबाहेच्या नागरिकांबाबत माहिती मिळवण्यासाठी एनपीआर आवश्यक आहे. एनआरसीबाबत स्पष्ट करण्यात आले आहे की आतापर्यंत हे तयार करण्यात आलेले नाही.” असं रजनीकांत यांनी माध्यमांना सांगितलं होतं.