मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानचा ‘पी.के’ हा चित्रपट आधीच त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेमुळे खूप चर्चेत राहिला आहे. त्यातून अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’शी चित्रपटाच्या तारखेची टक्कर होत असल्यामुळे अनुरागने दाखविलेल्या नाराजीमुळे तर बॉलीवूडमध्ये चर्चेला उधाण आले होते. याआधी ‘पी.के’च्या प्रदर्शनासाठी मे महिना ठरविण्यात आला होता. पण, त्याच्या सत्यमेव जयते २ या कार्यक्रमामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून ख्रिसमसचा मुहूर्त निश्चित करण्यात आला.
मात्र, आता विधू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिराणी यांनी ‘पी.के’ १९ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. डिस्नी या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, फॉक्स स्टारनेही बॉम्बे वेल्वेटच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. मात्र, हा चित्रपट ख्रिसमसच्याच काळात प्रदर्शित केला जाईल, अशी चर्चा आहे.