पॅडी कांबळे वेगळ्या भूमिकेत
दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमुळे कलाकार अक्षरश: प्रत्येक घराघरात पोहोचतात. प्रेक्षकांच्या घरचेच होऊन जातात. मालिकेती एखाद्या कलाकाराची भूमिका छोटी असो अथवा मोठी तो कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतो. त्याच्या खऱ्या नावापेक्षाही तो मालिकेत करीत असलेल्या भूमिकेच्या नावाने ओळखला जातो. झी मराठीवरील ‘होणार सून मी हय़ा घरची’ मालिकेतील ‘जान्हवी’चा भाऊ ‘पिंटय़ा’ हे पात्रही लोकप्रिय झाले आणि ‘पिंटय़ा’ साकारणारा रोहन गुजर प्रत्येकाच्या ओळखीचा झाला. हाच ‘पिंटय़ा’आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘येक नंबर’ या मालिकेतून आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आला आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘येक नंबर’ ही मालिका ‘देवा आणि वेदा’ यांच्या प्रेमप्रकरणामुळे मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. दोघांच्या प्रेमप्रकरणाने आत्तापर्यंत वेगवेगळी वळणे घेतली आहेत. लग्न करून देवाच्या घरी आलेल्या वेदाला दररोज नव्या आव्हानाना तोंड द्यावे लागत आहे. सयाजी भंडारी (सासरे) व पल्लवी (नणंद) यांच्याशी तिचा संघर्ष सुरू आहे. या मालिकेत आता एका नव्या चेहऱ्याची म्हणजेच ‘बबन’चा प्रवेश झाला आहे. ‘बबन’ची भूमिका प्रेक्षकांचा लाडका ‘पिंटय़ा’ अर्थात रोहन गुजर करीत आहे. शनिवारी प्रसारित झालेल्या ‘येक नंबर’च्या भागात रोहनचा प्रवेश झाला आहे.
बबन हा स्वभावाने खेळकर असला तरी केवळ पैसा मिळविण्यासाठी तो कोणत्याही थराला जाणारा आहे. भंडारी यांच्या घरात बबनचा प्रवेश कसा होतो, तो या घरामध्ये येण्याचे नेमके कारण काय आहे ते मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सोमवार ते शनिवार या दिवशी दररोज रात्री नऊ वाजता मालिकेचे प्रसारण होत आहे. अभिनेता रोहन गुजर ऊर्फ ‘पिंटय़ा’चे काम मालिकेच्या काही भागात असले तरी येथे तो कसे काम करतो, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
‘पॅडी’ कांबळे ‘कमला’मध्ये
चित्रपट आणि मालिकांमधून विनोदी अभिनेता असा शिक्का बसलेला पंढरीनाथ ऊर्फ पॅडी कांबळे हाही ‘कलर्स मराठी’वरील ‘कमला’ या मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. पॅडीने आजवर साकारलेल्या भूमिकेपक्षा ही भूमिका वेगळी ठरणार आहे. नाटककार आणि साहित्यिकविजय तेंडुलकर यांच्या ‘कमला’या नाटकावर आधारित असलेली ही मालिका खरे तर पहिल्या काही भागातच संपली आहे. आता मालिकेसाठीचे स्वातंत्र्य घेऊन मूळ कथानकाला आता वेगवेगळी उपकथानके जोडण्यात येत आहेत. आता मालिकेत ‘कमला’च्या नवऱ्याचा प्रवेश होणार आहे. ‘कमला’च्या नवऱ्याची भूमिका पॅडी कांबळे करणार आहे. त्याचे कामही मालिकेच्या काही भागांतच असणार आहे. मात्र त्याच्या प्रवेशामुळे मालिकेच्या काही भागांत आता ‘कमला’, ‘देव’, ‘शरयू आणि ‘कमला’चा आलेला नवरा यांच्यावर सर्व लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. ‘कमला’मध्येच ‘होणार सून मी हय़ा घरची’ मालिकेतील ‘बेबी आत्या’ अर्थात अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर आता ‘जोशी काकू’ या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. शरयू आणि सारिका ‘कमला’चे लग्न जमविण्यासाठी ‘जोशी काकू’ कडे येतात, असे दाखवले आहे.
‘होणार सून मी हय़ा घरची’ मालिकेतील दोन कलाकार आता लगेचच वेगळ्या मालिकांमध्ये प्रेक्षकांसमोर आले आहेत.