संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाला सध्या अनेक स्तरातून विरोध होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना या चित्रपटाबाबत वाद-प्रतिवाद थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. यामध्ये आता मराठमोळी अभिनेत्री रेणूका शहाणेनेही उडी घेतली असून, एखाद्या कलाकृतीला विरोध दर्शविणे योग्य नाही असे तिने आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. फेसबुक अकाऊंटवर यासंदर्भातील फोटो अपलोड करत तिने आपला राग व्यक्त केला आहे.

रेणुका म्हणते, ‘पद्मावत’सारख्या चित्रपटावर बंदीसाठी अट्टाहास करण्यापेक्षा महिलांवर होत असणारे बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि स्त्री-भ्रूण हत्या यांसारख्या गोष्टींवरील प्रतिबंधासाठी पुढाकार घ्यायला हवा.’ या पोस्टमध्ये रेणूकाने कोणकोणत्या गोष्टींवर बंदी आणली पाहिजे याचे पोस्टर आपल्या हातात घेऊन ती पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये बॅन रेप, बॅन फिमेल फिटीसाइट आणि बॅन सेक्शुअल मोलेस्टेशन असा संदेश देणारे फलक तिने धरल्याचे दिसते. त्यामुळे एकीकडे इतके महत्त्वाचे विषय असताना चित्रपटाला विरोध करणाऱ्यांचा तिने प्रतिकात्मक पद्धतीने निषेध केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ‘पद्मावत’ चित्रपटाच्या बाजूने निकाल देऊनही करणी सेनेची भूमिका मात्र बदललेली नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे दोन दिवस बाकी असताना सेनेचा विरोध तसुभरही कमी झाला नाही. नुकतेच गुरुग्राममध्ये सिनेमाला विरोध केल्यानंतर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी लोकांना मारहाण केल्याची घटना घडली. सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमाला प्रदर्शनासाठीचा हिरवा कंदीला दिला असला तरी गुजरात आणि राजस्थानमध्ये सिनेमाच्या स्क्रिनिंगवर थिएटर मालकांनी बंदी घातली आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी या दोन राज्यातील थिएटर असोसिएशनने हा निर्णय घेतला.