दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘पद्मावत’ची घोषणा केल्यापासूनच प्रेक्षकांच्या नजरा या चित्रपटाकडे खिळल्या. संजय लीला भन्साळींचा चित्रपट म्हटलं की काहीतरी भव्य पाहायला मिळणारी याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच खात्री असते. चित्रपटाभोवती असलेले वादविवाद आणि त्यामुळे प्रदर्शनाला विलंब होऊनही ‘पद्मावत’कडे बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणूनच पाहिले जाते. नुकतीच, या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून, त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईविषयी काही तर्क लावण्यात येत आहेत.

वाचा : ‘पद्मावत’मधील हे चार दमदार संवाद व्हायरल

‘पद्मावत’ आणि ‘पॅडमॅन’ आधी २५ जानेवारीला एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. पण, अक्षय कुमारने ‘पद्मावत’चा मार्ग मोकळा करत ‘पॅडमॅन’ पुढच्या महिन्यात ९ तारखेला प्रदर्शित होणार असल्याचे जाहिर केले. त्यामुळे ‘पद्मावत’ला तसे पाहायला गेले तर कोणत्याही मोठ्या चित्रपटाची टक्कर नाही. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आल्याने चित्रपटाला एक मोठा आठवडला मिळाला आहे. सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ नंतर यावर्षात बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणारा ‘पद्मावत’ हा दुसरा मोठा चित्रपट आहे. जवळपास १९० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘पद्मावत’च्या पहिल्या आठवड्यातील कमाईविषयी व्यापार समीक्षक अक्षय राठी याने काही अपेक्षित आकडेवारी सांगितली.

वाचा : शाहरुख खान चौथ्या अपत्याचे नाव ठेवणार आकांक्षा

‘पद्मावत’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार यात शंका नाही. भारतीय इतिहासाला हा चित्रपट म्हणजे एकप्रकारे मानवंदना आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच म्हणजे २४ जानेवारीच्या पेड प्रिव्ह्यू बुकिंगला सुरुवात झाली आहे. शुक्रवार आणि रविवारसाठी उत्तम अॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा जवळपास ७० टक्के प्रतिसाद या दिवसांमध्ये मिळू शकतो. २५ ते २८ जानेवारी या चार दिवसांमध्ये ‘पद्मावत’ १०० कोटींच्यावर कमाई करेल. या कमाईत २४ तारखेच्या पेड प्रिव्ह्यूचा आकडा पकडण्यात आलेला नाही, असे अक्षय राठीने म्हटले.