अनेक वादविवादांनंतर अखेर ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला आहे. येत्या २५ तारखेला हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येईल. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर ‘पद्मावत’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे टीझर प्रदर्शित केले आहेत. त्याचसोबत ‘घुमर’ गाण्याचे नवे व्हर्जनही प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘घुमर’च्या या नव्या व्हर्जनमध्ये दीपिका पदुकोणची कंबर झाकण्यात आली आहे.

वाचा : अनुषाशी लग्न करण्याचा सध्या विचार नाही- करण कुंद्रा

‘पद्मावत’ प्रदर्शित करण्यापूर्वी त्यात पाच बदल करण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले होते. यात ‘घुमर’ गाण्यातील बदलाचाही समावेश होता. गाण्यात सीजीआयच्या माध्यमातून बदल करत दीपिकाची कंबर झाकण्यात आली आहे. चित्रपटात राणी पद्मावतीला अशा पद्धतीने दाखवण्यात आल्यामुळे करणी सेनेसोबतच जयपूरमधील शाही कुटुंबाने विरोध दर्शवला होता.

‘घुमर’ गाण्यात ज्याठिकाणी दीपिकाच्या कमरेचा भाग दिसत असेल ती दृश्यं काढू टाकण्यात यावीत असे आदेश सेन्सॉरने चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना दिले होते. मात्र, गाण्यातील दृश्यांना कात्री लावल्यास गाण्याचे संपूर्ण नृत्य दिग्दर्शनच बिघडले असते. त्यामुळे ग्राफिक्सच्या माध्यमातून दीपिकाची कंबर झाकण्याचा मार्ग दिग्दर्शकाने निवडला.

वाचा : ‘पद्मावत’ची बाजू सुप्रीम कोर्टात मांडणाऱ्या हरिश साळवेंना जीवे मारण्याची धमकी

रणवीर, दीपिका आणि शाहिद यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘पद्मावत’ची अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’शी बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार होती. मात्र, ‘पॅडमॅन’च्या निर्मात्यांनी सद्यस्थितीचे गांभीर्य समजून घेत ‘पॅडमॅन’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आता ‘पद्मावत’ २५ जानेवारी तर ‘पॅडमॅन’ ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होतील. दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी विचारविनिमय करून सामंजस्याने हा निर्णय घेतल्याने आता प्रेक्षकांसमोर असलेला तेढही सुटला आहे. प्रेक्षकांना आता दोन विविध विषयांवर आधारित या चित्रपटांचा मनमुराद आनंद घेता येईल.