चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेवेळी आपण इतक्या कमी वेळात प्रकाशझोतात येऊ याची पुसटशी कल्पनाही तिला नसेल. पण, तिच्या येण्याने सर्वकाही बदललं आणि ‘अभिनेत्री असावी तर अशी’, हेच उद्गार उत्फूर्तपणे अनेकांच्या तोंडून बाहेर पडले. सौंदर्य आणि अभिनय यांचं न उमगणारं समीकरण म्हणून ओळखली जाणारी ‘ती’ म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ या चित्रपटातून दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि रुपेरी पडद्यापासून ते प्रेक्षकांच्या मनापर्यंत सर्वच ठिकाणी तिचीच जादू पाहायला मिळाली.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या चित्रपटातील भूमिकेसाठी अनेकांनी दीपिकाचे कौतुक केले. शुभेच्छा पत्र आणि पुष्पगुच्छांची तर तिच्या घरी गर्दी झाली. या साऱ्यामध्ये एका खास व्यक्तीने दीपिकाची प्रशंसा केली असून, तिला मोलाची भेटवस्तूही दिली आहे. नव्या जोमाच्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कलेला दाद देण्यासाठी बॉलिवूडमधील बरेच ज्येष्ठ कलाकार पुढे येतात. त्यातील एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा. एखाद्या कलाकाराचे काम आपल्याला मनापासून आवडले तर रेखा नेहमीच त्यांची प्रशंसा करतात. यावेळी त्यांच्या प्रशंसेस पात्र ठरलीये राणी पद्मावती साकारणारी दीपिका पदुकोण.

https://www.instagram.com/p/BezXwdehXVS/

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेखा यांनी दीपिकाला एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी राणी पद्मावतीची भूमिका आपल्याला भावल्याचे लिहित त्यांनी दीपिकाची प्रशंसा केली. त्यांचे हे पत्र वाचून दीपिकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. रेखा आणि दीपिका यांच्यात एक अनोखं नातं आहे. कारण, याआधीही त्यांनी दीपिकाला ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील अभिनयासाठी भेट स्वरुपात एक सुंदर साडी दिली होती. मुळात आपल्या कामाची दखल घेतली जाणे आणि आपल्या कामाची पोचपावती मिळणे हेसुद्धा तिच्यासाठी सर्वतोपरी महत्त्वाचे असते हे मात्र नक्की.

https://www.instagram.com/p/Bb4j7rEBa2g/