संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पद्मावत’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून यावरून झालेला वाद आणि एकंदरीत परिस्थिती पाहता चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहिल्याचे फोटो अनेकजण पोस्ट करत आहेत. तर फेसबुकवर एका पेजच्या माध्यमातून हा चित्रपट लीक करण्यात आला आहे. त्या पेजवर थिएटरमधून फेसबुक लाइव्ह करत चित्रपट लीक करण्यात आला आहे.

वाचा : कोणत्याही कटशिवाय पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार ‘पद्मावत’

फेसबुकवरील ‘जाटों का अड्डा’ या पेजवरून ‘पद्मावत’ लाइव्ह करण्यात आला. फक्त ५३ मिनिटांच्या या लाइव्हला तब्बल एक लाख २९ हजार व्ह्यूज, सात हजारांहून अधिक शेअर्स आणि ८ हजार ८०० लाइक्स मिळाले. फेसबुकवरून हा व्हिडिओ सध्या काढून टाकण्यात आला असून संबंधित व्यक्तींवर आयटी अॅक्ट, कॉपी राईट अॅक्ट अंतर्गत कारवाई होऊ शकते अशी माहिती सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षातज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी दिली. इतकेच नव्हे तर लीक झालेला व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनाही ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाख रुपये दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे शेअर करणाराही यामध्ये तितकाच दोषी ठरतो.