संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या चित्रपटाला सुरुवातीपासून बराच विरोध करण्यात आला होता. पण अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि विरोधकांना चांगलच उत्तर मिळालं. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता कलाकार माध्यमांमध्ये खुलेपणाने चित्रपटाविषयी आपलं मत मांडत आहेत. अशाच एका मुलाखतीत रणवीरने काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. दीपिका पदुकोणचे नाक कापण्याच्या आणि तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे पाहून आपला संताप अनावर झाल्याचे खुद्द रणवीरनेच ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

भन्साळी आणि दीपिकाला आलेल्या धमक्यांविषयी प्रतिक्रिया देत रणवीर म्हणाला, ‘माझा राग त्यावेळी अनावर झाला होता त्याबद्दल काही वादच नाही. त्यावेळी मला व्यक्त होण्याची, त्या मुद्द्यावर संताप बाहेर काढण्याची इच्छा होती. पण, तसे काहीही न करण्याची मला ताकीद देण्यात आली होती. मुळात मला देण्यात आलेल्या त्या ताकिदीमुळेच मी शांत राहिलो.’ आपल्या एका उलट पाऊल उचलण्याने चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शकांसमोर अडचणी उभ्या राहिल्या असत्या आणि तसे काही व्हावे अशी माझी मुळीच इच्छा नव्हती, असंही त्याने स्पष्ट केलं.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

एक कलाकार म्हणून ज्यावेळी आपल्या स्वतंत्र्यावरच सावट येतं तेव्हा ती घुसमट आणि संताप व्यक्त करण्यासाठी काही मार्ग शोधण्याची प्रकर्षाने गरज जाणवू लागते. रणवीरच्या बाबतीतही असंच झालं होतं. पण, त्याने हा सर्व राग आणि संताप खिल्जी साकाण्यासाठी वापरात आणला आणि सर्वस्व अर्पण करुन या चित्रपटासाठी आपलं योगदान दिलं. भन्साळींच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘पद्मावत’ या चित्रपटात रणवीरने साकारलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, खलनायकी रुपातील रणवीर सर्वांनाच भावला आहे हे खरं.

VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा