राजस्थानपाठोपाठ आता मध्यप्रदेश आणि गुजरातमध्येही संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेला हा बहुप्रतिक्षित चित्रपट २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजपूत संघटनांचा होणारा विरोध पाहता कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काही राज्यांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात येत आहे. त्यामुळे भन्साळींच्या या चित्रपटामागचे शुक्लक्लाष्ठ काही जाताना दिसत नाही.

प्रदर्शनबंदीची भूमिका मांडताना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, ‘चित्रपटाचं नाव जरी बदलले तरी मध्यप्रदेशात हा सिनेमा प्रदर्शित होणार नाही. जे मी याआधी सांगितलं होतं, तेच होणार.’ सेन्सॉर बोर्डाकडून हा चित्रपट प्रमाणित होण्याआधीही त्यांनी प्रदर्शनावर बंदी घातली होती. त्यानंतर महाराणी पद्मावती यांना राजमातेचा दर्जाही त्यांनी दिला होता. त्याचबरोबर राज्यात ‘पद्मावती’चं स्मारक उभारण्याचीही घोषणा केली होती. ‘पद्मावत’विरोधी भूमिकेवर चौहान ठाम राहिल्याने राजपूत समाजाने या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Padmaavat row : सेन्सॉरच्या कार्यालयाबाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांचा घेराव, काही कार्यकर्ते ताब्यात

दुसरीकडे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी प्रदर्शनावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात ‘पद्मावत’च्या विरोधात निदर्शने झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.