अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर स्टारर ‘पॅडमॅन’ हा सिनेमा २६ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण आता निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली असून, एक दिवस आधी म्हणजे २५ जानेवारी केली आहे. अक्षय आणि ट्विंकलने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. ट्विंकलने अक्षयचा ‘पॅडमॅन’मधील एक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, ‘कधी तरी पाळी एक दिवस आधी येते, तसेच आमचा सिनेमाही एकदिवस आधी प्रदर्शित होत आहे. ‘पॅडमॅन’ २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.’
सगळे काही सुरळीत असताना निर्मात्यांनी एक दिवस आधीच सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय का घेतला याची माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही. कदाचित २६ जानेवारीला असणाऱ्या सुट्टीचा निर्माते जास्तीत जास्त फायदा उठवू इच्छितात. त्यामुळे एक दिवस आधी सिनेमा प्रदर्शित केला तर सिनेमाबद्दलच्या चांगल्या गोष्टी ऐकून प्रेक्षक २६ तारखेला सिनेमा पाहायला जाईल असा अंदाज निर्माते बांधत आहेत.
आतापर्यंत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख दोन वेळा बदलण्यात आली आहे. सुरूवातीला १३ एप्रिल २०१८ ही तारीख समोर आली होती. पण त्यानंतर २६ जानेवारीवर शिक्कामोर्तब झालं. पण आता हा सिनेमा २५ जानेवारी या तारखेलाच प्रदर्शित होणार आहे.
अक्षय कुमारने आर बाल्की दिग्दर्शित या सिनेमाचे चित्रीकरण फक्त ३७ दिवसांमध्ये पूर्ण केले होते. बल्की यांनी आतापर्यंत ‘चीनी कम’, ‘पा’, ‘शमिताभ’, ‘की अॅण्ड का’ सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. अरुणाचलम मुरुगानंथम यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. अरुणाचलम यांनी ग्रामीण भागातल्या स्त्रियांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या यंत्राची निर्मिती केली होती. यासाठी त्यांना करावा लागलेला संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 5, 2018 1:28 pm