बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि समाजकार्य याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अक्षयने अनेकदा जवानांना मदतीचा हात दिला आहे. त्याच्या सिनेमांमधूनही तो सतत काही ना काही नवीन देण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करतो. नुकतेच अक्षयने मुंबई सेंट्रल एसटी बस डेपोमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची वेंडिंग मशीन स्थापित केली आहे. सिनेमासाठी फक्त एकाच ठिकाणी अशी वेंडिंग मशिन प्रस्थापित केली नसून देशभरात अन्य ठिकाहीणी अशा मशिन प्रस्थापित करण्याचा त्याचा मानस आहे.

अक्षयचा नुकताच आलेला ‘पॅडमॅन’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात मासिक पाळी आणि तेव्हा घ्यावी लागणारी स्वच्छता यावर भाष्य केले गेले आहे. पण हा सिनेमा फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनपुरताच मर्यादित राहू नये असे अक्षयला वाटले. म्हणून त्याने एक पाऊल पुढे जात मुंबई सेंट्रल एसटी बस डेपोमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशिनचे उद्घाटन केले.

या मशिनच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. अक्षय आणि आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटो शेअर करताना अक्षय म्हणाला की, ‘आज मुंबई सेंट्रलच्या एसटी डेपोमध्ये एक सॅनिटरी नॅपकिन्सची वेंडिंग मशीन स्थापित करण्यात आली. यानंतर संपूर्ण देशभरात अशा अजून मशीन लागण्याची आशा आहे. या कार्याच्या समर्थनासाठी आदित्य ठाकरेंचे धन्यवाद.’ अक्षयनंततर आदित्य ठाकरेनीही इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हटले की, ‘सिनेमा लवकरच १०० कोटींचा आकडा पार करेल. नेहमीच चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहिल्याबद्दल अक्षय कुमार तुझे आभार.’