23 October 2018

News Flash

Padmavat: ‘तर आम्ही किल्ल्यात जौहर करु’; चित्तोडगढच्या महिलांनी दिली धमकी

क्षत्रिय समाजातील महिला २४ जानेवारीला जौहर करतील

दीपिका पदुकोण

निर्माता- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत सिनेमा मागची संकटं काही केल्या कमी होत नाहीत. २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे असे म्हटले जात असताना अजूनही सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदिल मिळालेला नाही. सुरूवातीला या सिनेमाचे नाव पद्मावती होते. मात्र बोर्डाने नावात बदल करण्याचे सुचवल्यानंतर निर्मात्यांनी सिनेमाचे नाव पद्मावत करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान चित्तोडगढ येथील महिलांनी सरकारला धमकी दिली की, जर पद्मावत सिनेमा प्रदर्शित झाला तर महिला तिथल्या किल्यांमध्ये जाऊन जौहर करतील. चित्तौडगढ येथे झालेल्या सर्वसमाज बैठकीमध्ये सदस्यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध दर्शवला. या बैठकीत सुमारे ५०० लोक सहभागी झाले होते. यात उच्चभ्रू परिसरातील १०० महिलाही उपस्थित होत्या.

राजपूत करणी सेनेचे प्रवक्ते वीरेंद्र सिंहने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘१७ जानेवारीला चित्तोडगढ येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्ग बंद करण्यात येतील.’ आज राजपूत सेनेचे एक शिष्टमंडळ गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटणार आहेत. राजनाथ सध्या उदयपुरमध्ये आहेत.

वीरेंद्र यांच्या मते, ‘१६ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी बाडमेर जिल्ह्यातील एका गावात रिफायनरी प्रोजेक्टचे उद्धाटन करणार आहेत. यावेळी ते मोदींकडे या सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करणार आहेत.’ एवढं बोलून वीरेंद्र थांबले नाहीत ते पुढे म्हणाले की, ‘एवढं करुनही जर सिनेमा प्रदर्शित करण्यात येत असेल तर क्षत्रिय समाजातील महिला २४ जानेवारीला जौहर करतील. याच दिवशी राणी पद्मावतीनेही जौहर केले होते.’

चित्तोडगढ येथील जौहर स्मृती संस्थानचे सचिव भंवर सिंह म्हणाले की, ‘पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्तोडगढ किल्यातील दरवाजे बंद करण्याची सोय करण्यात आली आहे. सुरूवातीला सिनेमाची तारीख २५- २६ ठरवण्यात आली होती. पण आता सिनेमा १७ जानेवारीला प्रदर्शित होणार असे म्हटले जात आहे.’

First Published on January 14, 2018 1:43 pm

Web Title: padmavat now kshatriya community women in chittorgarh to commit jauhar if the deepika padukone film releases