संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटावर मध्य प्रदेशमध्ये बंदी आणल्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. ‘पद्मावती’वर बंदी आणण्याच्या मागणीसाठी राजपूत संघटनांनी त्यांना निवेदन दिले होते. रविवारी चित्रपटाच्या निर्मात्यांकडून प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता त्यानंतर ही मोठी घडामोड समोर येत आहे. १ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. काही राजपूत संघटनांचा या चित्रपटाला विरोध कायम आहे.

राजपूत संघटनांकडून होणारा तीव्र विरोध आणि भन्साळी, दीपिका पदुकोणला मिळत असलेल्या धमक्या यांमुळेच प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डानेही तांत्रिक बदलांची कारणे देत चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला आहे.

इतिहासाची मोडतोड करून चित्रपट निर्मिती केल्याचा आरोप करणी सेनेने केला. राणी पद्मिनी आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यात प्रेमप्रसंग दाखवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर चित्रपटात असे कोणतेही दृश्य नसल्याचे भन्साळी यांनी आधीच स्पष्ट केले. स्पष्टीकरणानंतरही त्यांना धमक्या दिल्या जाऊ लागल्या. काही दिवसांपूर्वीच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दीपिकाचे नाक कापण्याची धमकी दिली होती. त्यामागोमागच आता अखिल भारतीय क्षत्रिय महासभेनेही दीपिकाला धमकावले आहे. तिला जिवंत जाळणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

चित्रपट निर्मात्यांना अशा प्रकारे धमकावण्यात येत असताना, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असताना सरकार गप्प का आहे, असा सवाल बॉलिवूड कलाकारांकडून केला जात आहे.