‘पद्मावती’ वादावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळीविरोधात बोलताना ते म्हणाले की, लोकांच्या भावनांशी खेळायची भन्साळींना सवय झाली आहे. जेवढी चूक विरोध करणाऱ्यांची आहे तेवढीच चूक भन्साळी यांचीही आहे. दिग्दर्शकावर निशाणा साधत योगी म्हणाले की, ‘सिनेमासाठी होत असलेल्या विरोधाला, प्रदर्शनांना आणि धमक्यांना भन्साळीदेखील तेवढेच जबाबदार आहेत. या प्रकरणात विरोधकांवर कार्यवाई होते तशीच सिनेमाच्या निर्मात्यांवरही झाली पाहिजे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे धमकी देणारे जसे दोषी आहेत तसेच भन्साळीही दोषी आहेत. पण असे असले तरी जीवे मारण्याची धमकी देणे योग्य नाही. एकमेकांचा योग्य तो सन्मान करायला हवा,’ असे योगी आदित्यनाथ माहणाले.

‘ज्या पद्धतीने विरोधकांना प्रदर्शने करुन सिनेमाचा विरोध करण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे दिग्दर्शकालाही त्याचे विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही सिनेमाचा विरोध करु शकता पण एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही आमचे अधिकार नाकारू शकत नाहीत,’ असे सुधीर मिश्रा यांनी इफ्फी महोत्सवादरम्यान सांगितले.

दरम्यान दीपिकाने ‘ग्लोबल आंत्रप्रुनरशिप समिट’ कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने या प्रकरणात लक्ष न घातल्यामुळे या रोषापोटीच कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमाशी संबंधित एका व्यक्तीने माध्यमांना ही माहिती दिली. मुख्य म्हणजे या संमेलनात दीपिका ‘हॉलिवूड टू नॉलिवूड टू बॉलिवूड: द पाथ टू मुव्हीमेकिंग’ या सेशनमध्ये भाषणही करणार होती. पण, तिने या कार्यक्रमालच जाण्यास नकार दिल्याने आयोजकांपुढेही मोठा पेच उभा राहिला आहे.