संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’चा ट्रेलर सोमवारी दुपारी १ वाजून ३ मिनिटांनी प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये मुख्य तीनही कलाकारांना या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. दीपिका पादुकोण (राणी पद्मावती), शाहिद कपूर (राजा रावल रतन सिंह), रणवीर सिंग (अलाउद्दीन खिल्जी) या तीनही व्यक्तिरेखा तेवढ्याच ताकदीच्या आहेत. ३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये फक्त दोनच संवाद आहेत. त्यातील पहिला संवाद शाहिद कपूरच्या तोंडी आहे तर दुसरा संवाद दीपिका बोलताना दिसते. पण या संपूर्ण ट्रेलरमध्ये रणवीर सिंगचाच वरचष्मा दिसून येतो. दीपिका जेवढ्या वेळासाठी स्क्रिनवर दिसते ती सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यात यशस्वी ठरते.

सुरेख दागिन्यांमध्ये मढलेली दीपिका कोणत्याही बाहुलीपेक्षा कमी दिसत नाही. तुम्हाला माहितीये का की आता तुम्ही राणी पद्मावतीची बाहुली विकत घेऊ शकता? राणी पद्मावतीसारख्या सजलेल्या बाहुल्या अनेक ई-कॉमर्स साइट्सवर विकायला ठेवल्या आहेत. या बाहुल्यांनाही अनेक दागिन्यांनी सजवले आहे आणि लाल साडीही नेसवली आहे.

सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, पद्मावती सिनेमा १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहून प्रथमदर्शी हे दिसून येते की राजा रावल रतन सिंह आणि राणी पद्मावतीची प्रेमकहाणी आहे ज्यात अल्लाउद्दीन खिल्जी खलनायक होऊन त्यांच्या आयुष्यात प्रवेश करतो. पण खरे कथानक काय आहे हे तर सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा सिनेमा चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच वादात अडकला होता. त्यावेळी भन्साळी यांनी सिनेमाच्या कथानकासोबत कोणतीही छेडछाड न करण्याचे आश्वासन दिले होते.