‘पद्मावती’ या चित्रपटाच्या मुद्द्यावरुन सुरु असणारे वाद आता काही प्रमाणात शमले असून, चित्रपटातील कलाकार सध्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दीपिका ज्या कार्यक्रमांना जाते त्या ठिकाणी अनेकांच्याच नजरा तिच्यावर खिळलेलल्या पाहायला मिळतात. मुळातच सौंदर्याची खाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दीपिकाचा लूक नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. पण, ‘लक्स गोल्डन रोझ अवॉर्ड्स’मध्ये तिचा ‘गोल्डन लूक’ प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अपयशी ठरला.

सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये दीपिका या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अवतरली होती. मोनिशा जयसिंगने तिचा मेकअप केला होता, तर संध्या शेखरने तिची केशभूषा केली होती. पण, या साऱ्याचा दीपिकाच्या ड्रेसशी फारसा मेळ न बसल्यामुळे तिचा हा लूक फॅशन डिझास्टर ठरल्याचे म्हटले जातेय. शालिना नाथानी या सेलिब्रिटी स्टायलिस्टने आणि खुद्द दीपिकाने या लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. पण, नेटकऱ्यांनी लगेचच त्यावर आपले मत मांडत लूक फसल्याचे स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर, दीपिकाने दुसऱ्या स्टायलिस्टची निवड करावी असा सल्लाही तिला अनेकांनी दिला.

वाचा : विराटआधीही हे क्रिकेटर होते अभिनेत्रींच्या प्रेमात

https://www.instagram.com/p/Bch_8Vthg3f/

‘शालिना तू इतक्या सुंदर अभिनेत्रीला हा असा ड्रेस कसा देऊ शकतेस’, असा प्रश्नही काहीजणांनी विचारला. तर, ‘हा आतापर्यंतचा सर्वात वाईट ड्रेस आहे’, अशा प्रतिक्रियाही काही नेटकऱ्यांनी दिल्या. दीपिका एखाद्या ‘गिफ्ट रॅप’प्रमाणे दिसत असल्याचे म्हणत अनेकांनी तिची खिल्लीही उडवली. नेहमीच प्रशंसनीय कमेंट्स मिळणाऱ्या दीपिकाचा हा लूक चाहत्यांवर फारसा प्रभाव पाडू शकला नाही असेच चित्र सध्या पाहायला मिळते आहे. सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार होण्याची दीपिकाची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा बऱ्याचदा काही कार्यक्रमांच्या वेळी किंवा एखाद्या फोटोमुळे बॉलिवूडच्या या ‘मस्तानी’वर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.