प्रदर्शनापूर्वीच विविध कारणांनी चर्चेत राहिलेला ‘पद्मावती’ चित्रपटाची तुलना आता ‘बाहुबली २’ या चित्रपटाशी केली जाऊ लागली आहे. एस.एस.राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळालं होतं. आतापर्यंत कुठलाही बॉलिवूडपट ‘बाहुबली २’ची बरोबरी करु शकला नाही. मात्र आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा चित्रपट ‘बाहुबली २’ला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे असं म्हणायला हरकत नाही.

‘पद्मावती’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूरचा लूक नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पोस्टरचीही सोशल मीडियावर चर्चा आहे. ‘बाहुबली’प्रमाणेच भव्यता आणि निर्मितीचा एक वेगळाच स्तर ‘पद्मावती’मध्येही पाहायला मिळणार. सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्तम लोकेशन्स हे संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्यच आहे. याच गोष्टींमुळे या दोन चित्रपटांची तुलना होऊ लागली आहे.

वाचा : यांनी घेतला होता सलमानशी पंगा 

राजामौली यांच्या ‘बाहुबली’ सीरिजच्या दोन्ही चित्रपटांच्या यशाचं सर्वांत मोठं कारण होतं ते या चित्रपटांत वापरले गेलेले व्हिज्युअल इफेक्ट्स. इथेच भन्साळींची खरी कसोटी आहे. भव्यदिव्य सेट, हत्ती-घोडे, डोळे दिपवणारे महाल आणि अंगावर शहारे उभी करणारी युद्धातील दृश्यं अशा सगळ्यांची भरमार ‘पद्मावती’मध्येही पाहायला मिळणार. त्यामुळे या बहुप्रतिक्षित चित्रपटाकडून साहजिकच प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. या अपेक्षांवर ‘पद्मावती’ हा चित्रपट कितपत खरा उतरेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.