संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ सिनेमाचा एकीकडे विरोध होत आहे, तर बॉलिवूडकरांचा मात्र या सिनेमाच्या टीमला संपूर्ण पाठिंबा आहे. बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीनेही या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. अदिती म्हणाली, “एक देश म्हणून भारत कोणत्या दिशेला जात आहे हेच मला कळत नाही.”

अदितीने ट्विटर अकाऊंटवर आपले मत मांडताना म्हटले की, जेव्हा एखाद्या महिलेवर बलात्कार होतो, त्यांना विकले जाते, त्यांच्यावर हिंसा होते किंवा स्त्री भ्रूण हत्येसारखे प्रकार होतात तेव्हा लोकांना राग का येत नाही ? माझं देशावर मनापासून प्रेम आहे, पण या घटना माझ्या समजण्याच्या पलिकडच्या आहेत.’ या सिनेमात अदिती अलाउद्दीन खिल्जीच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. सिनेमात अदितीसोबत दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब पाठोपाठ आता गुजरातमध्येही ‘पद्मावती’ प्रदर्शित होणार नाही. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी ही माहिती दिली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ सिनेमावर राजपूत समाजाने आक्षेप घेतला आहे. ‘पद्मावती’ सिनेमातून चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा दावा करणी सेनेने केला आहे. त्यामुळे हा सिनेमा वादात सापडला आहे.